स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग हे स्वतंत्र केंद्र म्हणून यावर्षी पासून मान्यता..
माझा वेंगुर्ला यांच्या समन्वयाने आठ नाटकांचे होणार सादरीकरण..
वेंगुर्ले : दाजी नाईक : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने घेतली जाणारी ६३ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधी मध्ये वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांच्या वतीने “माझा वेंगुर्ला” तर्फे आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत पाच नाटके सादर झाली होती. त्याला नाट्य रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. त्यामुळेच यावर्षी आठ नामांकित नाटके वेंगुर्ले केंद्रावर सादर होणार आहेत, असे सांगण्यात आले यावेळी माझा वेंगुर्ला चे प्रशांत आपटे, राजन गावडे, दिलीप गिरप, निलेश चेंदवणकर, संजय पुनाळेकर, जयप्रकाश चमणकर, कपिल पोकळे, नासीर मकानदार आदी उपस्थित होते.
दरम्यान राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवा असे आवाहन संचालक चवरे यांनी केले आहे. वेंगुर्ला केंद्राचे समन्वयन माझा वेंगुर्ला ही संस्था करणार आहे.
यावर्षी पासूनच हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी सिंधुदुर्ग हे स्वतंत्र केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. हे वर्ष वेंगुल्यांचे सुपुत्र आणि थोर नाटककार जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या थोर नाटककाराच्या जन्मगावी म्हणजेच वेंगुर्ला येथे राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या सिंधुदुर्ग केंद्राच्या उद्घाटनाचा मान मिळत आहे ही जयवंत दळवी यांना एक आदरांजली ठरेल.
वेंगुर्ला येथील नाट्यप्रेमींना तब्बल आठ नाटकांची मेजवानी लाभणार आहे. रोज संध्याकाळी ठीक ७ वाजता एक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
१ डिसेंबर रोजी कलावलय वेंगुर्ले यांचे ‘चार बापांचा मुलगा’, २ डिसेंबर रोजी मायभूमी प्रतिष्ठान सावंतवाडी चे “मिशन 59” ३ डिसेंबर रोजी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे “तनमाजोरी” ४ डिसेंबर रोजी सातार्डा मध्यवर्ती संघाचे “गावय” ५ डिसेंबर रोजी सिद्धांत फाउंडेशन सिंधुदुर्ग चे “तुम्हाला काय वाटतं?” ६ डिसेंबर रोजी श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्गचे “सौजन्याची ऐशी तैशी” ७ डिसेंबर रोजी जीवनदायी विकास संस्था वेंगुर्ला यांचे “सूर्यास्त” आणि ८ डिसेंबर रोजी इंद्रधनु कला मंच दाभोली यांचे “श्याम तुझी आऊस इली रे” ही नाटके सादर होणार आहेत.
तरी नाट्यप्रेमींनी मागील वर्षीप्रमाणे मोठ्या संखेने या स्पर्धेतील नाटकांना उपस्थिती दर्शवावी आणि सर्वांचा उत्साह वाढवावा असे आवाहन करण्यात आले आहे.












