
कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली हि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. जिल्ह्यातील अनेक भागातून खरेदी – विक्री करण्यासाठी नागरिक येत असतात. मात्र वस्तुस्थिती पाहिली तर कणकवली शहरात सातत्याने सर्व्हिस रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही समस्या वारंवार उद्धवते. अनेकदा वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास देखील सहन करावा लागतो.
कणकवली पटवर्धन चौकात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार चंद्रकांत माने, संदेश आबिटकर हे ट्राफिकचे काम पाहत होते. मात्र त्यांना पोलीस ठाण्यात कार्यालयीन कामकाज दिल्याने त्या जागी दुसरे ट्राफिक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. परंतु नवीन नेमलेले ट्राफिक पोलीस हे किती वेळ पटवर्धन चौकात सेवा बजावतात ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांमधून उपस्थित केला जात आहे.
ज्या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस व होमगार्ड कार्यरत असतात त्याच ठिकाणी वाहने पार्किंग तळ बनला आहे. यामुळे सातत्याने पटवर्धन चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे व यामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच अनेकदा वाहतूक पोलीस पटवर्धन चौकात कार्यरत नसल्याने केवळ शिट्ट्या मारण्यापुरते होमगार्ड कार्यरत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. तसेच अनेकदा वाहतूक पोलीस कार्यरत असून देखील त्यांच्याकडून खुलेआम पार्किंग केल्या जात असलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे हे पोलीस येथे काय कामाचे? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
सकाळच्या सत्रात खुलेआम हॉटेल मंजुनाथ ते नरडवे फाटा दरम्यान दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा रिक्षा, टेम्पो, मोटारसायकल, अवजड वाहने कुणी वालीच नसल्यासारखे पार्किंग केलेली असताना सुद्धा वाहतूक पोलीस त्यावर कारवाई करत नाहीत. याचा फटका अनेकदा एसटी बस, रुग्णवाहिका यांना बसतो. तरी देखील ही वाहने हटवण्याच्या दृष्टीने किंवा कारवाईच्या दृष्टीने कार्यरत असणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने पटवर्धन चौकात कार्यरत असणारे होमगार्ड व वाहतूक पोलीस हे निव्वळ नावापुरतेच असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव हे लक्ष देतील काय? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.










