
भाग ०२- किल्ले महिपतगड
सेवा-सुविधांचा अभाव, ट्रेकर्ससाठी पर्यटकांची पसंती
देवेंद्र जाधव | खेड
‘‘राकट सह्याद्रीची पर्वत रांग… चढणीचा व तितकाच निबीड जंगलातून जाणारा थकवणारा रस्ता किंबहुना मळलेली पायवाटच… अन निसर्गाच्या सानिध्यात ३ हजार ९९४ फूट उंचीवर सह्याद्रीच्या कोंदणात विसावा घेत असलेला व तितकाच अनोळखी अवशेषांनी असलेला ‘महिपतगड’ हा तालुक्यातील एकमेव सर्वाधिक उंचीवर असलेला शिवकालीन किल्ला शासनाच्या उदासिन धोरणामुळे पर्यटक, शिवप्रेमी यांच्या पासून गेली अनेक वर्षे दुर्लक्षितच राहिला आहे. या किल्ल्यावरील अनेक आढळून येणारे अवशेष आजही इतिहासाची गौरवगाथा सांगत आहेत.’’
तालुक्याच्या पुर्वेस १२ मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड या पर्वत रांगेतील महिपतगड सहजासहजी दृष्टी पथात येत नाही. उत्तर दिशेला १२० एकर क्षेत्रफळावर महिपतगड आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. एकीकडे उंची अन विस्तार यामुळे किल्ल्याचा परिसर प्रचंड विस्तीर्ण आहे. याच परिसरात महिपतगड-सुमारगड-रसाळगड असा ट्रेक देखील प्रसिध्द असुन दरवर्षी हजारो ट्रेकर्स आधुनिक साहित्यांच्या मदतीने सह्याद्रीच्या राकट पर्वत रांगांवर जाण्याचा प्रयत्न करत असतात. सर्वाधिक उंची हेच या किल्ल्याचे ‘बलस्थान’ असल्यामुळे या गडावर उन्हाळयात देखील थंड वातावरणाचा अनुभव घेता येतो. या किल्ल्याच्या इतिहासाबाबत सांगायचे झाले तर शिवाजी महाराजांनी कर्नाटक पर्यंतच्या मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या. या मोहिमांवरूYन स्वराज्याची राजधानी रायगड येथे परतण्याचा लांब पल्ला पार करताना मावळयांची दमछाक होत असे. त्यांच्यासाठी एखादे विश्रांती स्थान असावे या उद्देशाने महाराजांनी या महिपतगडाची उभारणी केली. परंतु हा किल्ला अस्तित्वात असुन देखील येथील सेवा-सुविधा अथवा त्याच्या इतिहासाबद्दल आजही जास्त प्रकाशझोत पडलेला नाही. केवळ उंचीवर असलेला किल्ला इतकीच काही ती ओळख या किल्ल्याची सांगता येत आहे. या किल्ल्याचा परिसर ४ किमी इतका विस्तीर्ण स्वरूYपात पसरला आहे. गड त्रिकोनी आकाराचा आहे. तीन दिशांनी तटबंदी उभारण्यात आली आहे. मात्र गडाच्या चारही बाजूंनी तुटलेले कडे आहेत.
त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तटबंदीची गरज भासत नाही. परंतु सद्य स्थितीत या तटबंदीची पडझड झालेली दिसून येते. या गडाला एकूण ६ दरवाजे असुन ईशान्य बाजूस लाल देवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा आणि आग्नेयेस यशवंत दरवाजा असे आहेत. सद्य स्थितीत या दरवाजांच्या केवळ पाऊल खुणा उरल्या आहेत. शिवगंगा दरवाजा जवळ शिवाची पिंड, पुसाटी दरवाजाजवळ एक शिडी, कोतवाल दरवाजाजवळ मारूYती मंदिर तर पारेश्वर या देवतेचे स्वयंभू मंदिर आहे. त्या मंदिरासमोरच शिवकालीन विहीर देखील आहे. गडावरील भवानी मातेच्या मंदिराजवळ गड उभारताना गुळ व चुना यांच्या मिश्रणासाठी उभारलेल्या भट्टांचे अवशेष आजही दिसून येतात. किल्ल्यावर भुयार देखील आहेत. मात्र ते सद्य स्थितीत दगड, मातीने भरूYन गेले आहेत. गडावर पाण्याचे ७ ते ८ टाके आढळून येतात. त्यापैकी काही नष्ट झाले आहेत. किल्ल्यावरील पठार म्हणजे एक जंगलच आहे. त्यावर अनेक अवशेष या झाडीत लपलेले आहेत. तसेच वन्य प्राण्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात आहे. गडावर तीन तोफा असुन दोन तोफा लहान तर एक ६ फूट लांबीची दिसून येते. किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असलेले अजिंक्य टोक तसेच लाल देवडी दरवाजा या ठिकाणाहून प्रतापगड, महाबळेश्वर, किल्ले रायगड या किल्ल्यांचे विहंगम दृश्य दृष्टी पथात येते.
खेड-वाडी बेलदार या मार्गावर असलेला हा ऐतिहासिक किल्ल्याकडे जाणारा रस्ता देखील धड नसल्याने वाहन चालकांना मात्र चांगलीच कसरत करावी लागते. पायथ्याशी वसलेल्या छोटे खानी गावातूनच मळलेल्या पाय वाटेने या किल्ल्यावर पोहचता येते. परंतु गेली अनेक वर्ष या किल्ल्याकडे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी यांचा ओघ वाढलेलाच आहे. परंतु या ठिकाणी कोणत्याच सेवा-सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ माहितगारच, दुर्गप्रेमी जात आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी साधी पायवाट देखील सुस्थितीत नसल्याने या किल्ल्याकडे व तेथील इतिहास जाणून घेण्याकरीता दुर्गप्रेमींना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
किल्ल्यावर बाजारपेठ, अनेक देवतांची मंदिरे, छत्रपतींचा पडका राजवाडा, नष्ट झालेले दरवाजे, समाधी स्थळे या सारख्या अनेक इतिहासाच्या पाऊल खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या ऐतिहासिक दुर्गावरील या पाऊल खुणांवर गर्द जंगलाने आक्रमण केले आहे. छत्रपतींचा गौरवशाली इतिहास या दुर्गावरील ऐतिहासिक असलेल्या अवशेषांमध्ये गडप झाला असुन तो पहूडलेल्या स्थितीतच आहे. तरी ही या स्थितीत देखील आपल्या इतिहासाची गौरवगाथा सांगत आहेत. मात्र या किल्ल्यावरील हे अवशेष संवर्धन करण्याची खरी गरज असताना या किल्ल्याकडे होत असलेले दुर्लक्ष या किल्ल्याच्या पडझडीला अजून कारणीभूत ठरणारे आहे.
एकीकडे किल्ल्याचा किंबहुना छत्रपतींचा गौरवशाली इतिहास अन त्या इतिहास आपल्या पोटात घेवून अनेक वर्ष निसर्गाशी दोन-दोन हात करत उभा असलेला महिपतगड आपल्या राजाची किर्ती अभिमानाने सांगत आहेत. परंतु राज्य प्रशासनाने १ रूपया देखील या किल्ल्यावर खर्ची टाकलेला नाही. त्यामुळे या किल्ल्याचे अस्तित्वच आगामी काळात नष्ट होण्याची भिती दुर्गप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. किल्ल्यावर अनेक असलेले अवशेष यांचे संवर्धन तसेच ते जतन केले गेल्यास या किल्ल्याचा सुवर्णशाली इतिहास उकलण्याची शक्यता आहे. मात्र सद्य स्थितीत केवळ ट्रेकर्ससाठी हा किल्ला उपयुक्त असल्याचे म्हटले जात आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी राहणारे अनंत जाधव ही व्यक्तYी गेली अनेक वर्ष या गडाची निगराणी करून किल्ल्यावरील असलेल्या समाधी स्थळांचा आपल्या परीने जपणूक करीत हा गौरवशाली इतिहास येणाºया पिढीला माहित व्हावा त्या दिशेने ते एकटे प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांचे प्रयत्न देखील थिटेच पडत असुन शासकीय निधीच्या दातृत्वाचा हात या किल्ल्याला देखील मिळणे गरजेचे आहे. तरच हा किल्ला अन त्यावरील इतिहास आगामी पिढीला सांगता येणार आहे.











