मुंबई-गोवा महामार्ग कामाचे होणार ‘ऑडिट’ करण्याची मागणी

 

खेड(प्रतिनिधी) गेल्या १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वाहनचालकांच्या मार्गात मनस्ताप कायमच आहे. महामार्गाचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी रस्त्याला तडे गेले असून खड्डेही पडले आहेत. रस्त्यावरील सिमेंट कॉक्रिटची खडीही निदर्शनास येत आहे. महामार्गाच्या कामाचे ‘ऑडिट’ करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या मागणीची सरकारकडून गंभीर दखल घेण्याचे साकडेही गणेशभक्तांनी घातले आहे. महामार्गाचे ऑडिट झाल्यास दर्जाहिन कामाची पोलखोल होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्ग रखडलेल्या कामामुळे चर्चेचा विषय बनला आहे. महामार्गाच्या कामावर आतापर्यंत १५६४ कोटी रूपये खर्चाचा चुराडा करूनही महामार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. कासू ते इंदापूर या ४२ किलोमीटर रस्त्यासाठी ४१५ कोटी, पनवेल ते कासूदरम्यानच्या रस्त्यासाठी २५१ कोटी असे ६६६ कोटी खर्च झाले आहेत. यापूर्वी याच मार्गावर ८९८.९२ कोटी रूपये खर्च झाले आहेत. नव्याने सुधारित मंजुरीनुसार १,५६४ कोटी रूपये केवळ ८४ किलोमीटरसाठी खर्च होणार आहेत. हा कोकणवासियांच्या डोक्यावर भुर्दंड आहे..

महामार्गाच्या कामावर कोट्यवधी रूपये खर्चूनही अजूनही महामार्गाचे काम अर्धवट आहे. रस्त्यावरील कॉक्रिटीकरण आतापासूनच असून जागोजागी खड्डेही पडले आहेत. रस्त्यावरील काँक्रिटीकरणाची खडी दिसू लागली आहे. यामुळे महामार्गाच्या कामाबाबत सांशकता आहे.

पोलादपूरपासून सुरू महामार्गाच्या रस्त्यावर जागोजागी चर गेले आहेत. कशेडी बोगद्याच्या अलिकडे १ कि.मी. अंतरावर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर ६ इंच खोल असे लहान-मोठे खड्डे पडले आहेत.

या मार्गावरही काँक्रिटच्या मिश्रणातील खडी दिसत असल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. पुलावरील डांबरीकरणाची खडी डांबरापासून अलग होत असून रस्त्याकडेला पसरली आहे. यामुळे नवीन रस्त्यावरील प्रवास खडतर बनला आहे. आधीच महामार्गाची ‘वाट’ बिकट बनली आहे. त्यात दर्जाहीन कामाची भरही पडल्याने मुंबई-गोवा महामार्ग चर्चेत आला आहे. याचमुळे महामार्गाच्या कामाचा दर्जा पाहता ‘ऑडिट’ करण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.