आरक्षित तिकिटे मिळेनात; तुतारीला ‘रिग्रेट’ मिळाल्याने चाकरमानी प्रतीक्षा यादीवर
खेड(प्रतिनिधी)
शिमगोत्सवाची धामधूम यंदा १३ मार्चपासून सुरू होणार आहे. यामुळे कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. कोकणकन्या, जनशताद्वी, मांडवी, तुतारी एक्सप्रेसना ‘रिग्रेट’ मिळाल्याने चाकरमानी प्रतीक्षा यादीवर आहेत. यामुळे चाकरमान्यांच्या नज़रा होळी स्पेशलकडे खिळल्या आहेत.
गणेशोत्सवापाठोपाठ शिमगोत्सवातही ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. नियमित गाड्यांसह हिवाळी स्पेशलचे आरक्षण खुले होताच काही मिनिटातच सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल होत असल्याने चाकरमान्यांचा हिरमोड होत आहे
रेल्वे कडून होळी स्पेशल पाठोपाठ रेल्वेगाड्यांना अतिरिक्त डबे जोडून चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करते. तरीदेखील शिमगोत्सवात विक्रमी गर्दीने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे चाकरमान्यांना खासगी वाहनांचा आधार घेत गाव गाठावे लागते.
यंदाही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. शिमगोत्सवातील नियमित गाड्यांचे आरक्षण ७ जानेवारीपासून खुले झाले आहे. आरक्षण खुले होताच आरक्षित तिकीटे मिळवण्यासाठी चाकरमान्यांची तिकीट खिडक्यांवर एकच झुंबड उडाली. १३ व १४ मार्च रोजी धावणाऱ्या कोकणकन्या, जनशताब्दी, मांडवी, तुतारी एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण काही मिनिटातच फुल्ल होवून ‘रिग्रेट’ मिळाला आहे.
शिमगोत्सवातील अन्य गाड्यांचेही आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमानी ‘वेटींग वर आहेत. यामुळे शिमगोत्सवात गाव गाठायचे कसे, याची चिंता चाकरमान्यांना आतापासूनच सतावत आहे. रेल्वे प्रशासनाने अजूनही शिमगोत्सवासाठी होळी स्पेशल जाहीर केलेल्या नाहीत. मध्य व कोकण रेल्वे प्रशासन होळी स्पेशल गाड्यांची घोषणा करतेय कधी, याकडेच चाकरमान्यांच्या नजरा खिळल्या आहेत.








