वेंगुर्ले येथे १३ फेब्रुवारी ला “कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा”

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन..

वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले कॅम्प येथील तालुका क्रीडा संकुल येथे दिनांक १३ फेब्रुवारी रोजी कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा – २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले आहे. मत्स्य विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्पर्धेचे सकाळी ९.३० वाजता उद्घाटन होणार आहे.

वेंगुर्ले येथे १३ ते १५ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस होणाऱ्या या कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला राज्यमंत्री, गृह, महसूल, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. योगेश कदम, माजी मुख्यमंत्री श्री. नारायण राणे, विधान परिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे, आम. श्री. दिपक केसरकर, आम.श्री. निलेश राणे, आम.श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, अपर मुख्य सचिव महसूल विभाग श्री. राजेश कुमार (भा.प्र.से.) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख व जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.