खा. सुनील तटकरे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचना
अन्यथा बाजूला केले जाईल
सावर्डे येथील जिल्हा बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानपिचक्या
चिपळूण (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी मोहीम जोमाने करा. जे पदाधिकारी- कार्यकर्ते सभासद नोंदणी अग्रेसर राहतील, अशा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विकासकामांना प्राधान्य दिले जाईल. जे पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य नोंदणीमध्ये कमी पडतील, त्यांना बाजूला केले जाईल, अशा स्पष्ट शब्दांत सदस्य नोंदणीबाबत कानपिचक्या देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत दिला.
यावेळी आ. शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, निरीक्षक बाप्पा सावंत, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, माजी सभापती सौ. पूजा निकम, युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. साधना बोत्रे, सौ. दिशा दाभोळकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. जागृती शिंदे, शहराध्यक्षा सौ. आदिती देशपांडे, माजी सभापती सौ. रिया कांबळे दापोली तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, प्रकाश दळवी, राजेंद्र सुर्वे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष बंटी वणजू, अजय बिरवटकर आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भारतीय संविधान बदल व अल्पसंख्याक समजात गैरसमज पसरविले. हे मुद्दे आम्ही खोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात अपयश आले आणि महाराष्ट्रात महायुतीला १७ जागा मिळाल्या. तर उर्वरित जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. यामुळे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले होते. तर महाविकास आघाडीचे नेते विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला २०० हुन अधिक जागा मिळतील, असा दावा करीत होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना. एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आपण स्वतः आम्ही सर्वजण महायुती म्हणून तर तुम्ही पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लाडक्या बहिणींमुळे महायुतीला प्रचंड यश मिळाले. यानंतर लोकसभा निवडणुकीत गप्प असलेल्या विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधात ओरड करण्यास सुरुवात केली. विरोधक अजूनही यातून बाहेर पडायला तयार नाहीत, अशा शब्दांत महाविकास आघाडीवर टीका केली.
तर ते आणखी पुढे म्हणाले की, रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोली मतदारसंघात आपण सुमारे ८ हजार तर गुहागरात तब्बल २६ हजार मतांनी पिछाडीवर होतो. तर नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. योगेश कदम यांना सुमारे ५० हजारांहुन अधिक मताधिक्य मिळते. तर गुहागरात राजेश बेडल अवघ्या २८०० मतांनी मागे राहिले, याचा आढावा घेतांना खा. तटकरे यांनी कोणावर निशाणा साधला? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नव्हते. तरीही आपण पक्ष वाढवत होतो. आता तर रायगड लोकसभा मतदारसंघात तुम्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे खासदार म्हणून निवडून आलो आहोत. शेखर निकम दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यामुळे आम्ही दोघेजण पक्ष वाढ व विकासासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास दिला. सदस्य नोंदणी मोहिमेबाबत बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष ताकतीने मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी मोहीम जोमाने करावी. जे पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य नोंदणी मोहिमेमध्ये अग्रेसर राहतील, त्या सर्वांच्या पाठीशी ताकद उभी केली जाईल. तसेच पक्षाकडून जो कार्यक्रम दिला जाईल. तो राबवून त्यासंदर्भातील अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात यावा. तसेच शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा बाजूला केले जाईल, असा सूचक इशारा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी यावेळी देतांना आगामी जि. प., पं. स. नगर परिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी पाठीशी आहोत, अशी ग्वाही रा. काँ. चे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांनी यावेळी दिला.
यावेळी आ. शेखर निकम यांनी आपल्या मनोगतात आपल्या विजयात छोट्या – छोट्या कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींनी प्रचंड मेहनत घेतली. यामुळे आपण विजय होऊ शकलो. तर आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका महायुती म्हणून की स्वतंत्रपणे लढवायच्या हा निर्णय वरिष्ठ घेतील. मात्र, आपण पक्ष वाढवून सक्षम असले पाहिजे. चिपळूण नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे, असे आवाहन उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. यावेळी आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष का सुनील तटकरे यांचे स्वागत व सत्कार केला. तसेच अन्य मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले. या बैठकीचे सूत्रसंचालन संजय कदम यांनी केले.
चौकट
*येत्या १० मार्च रोजी दिल्लीत बैठकीचे नियोजन चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू- खा. सुनील तटकरे*
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकदम यांनी आपल्या मनोगतात चिपळूण कराड रेल्वे मार्ग रखडल्याचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा धरून प्रदेशाध्यक्ष, खा. सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात या प्रश्नासंदर्भात येत्या १० मार्च रोजी दिल्ली येथे रेल्वे मंत्र्यांसोबत बैठकीचे नियोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. या बैठकीला आ. शेखर निकम व शौकत मुकादम यांना देखील बोलावले जाईल, असे सांगितले.











