गाळ उपसण्याचे कामाला मिळणार गती
खेड(प्रतिनिधी)शहराला पावसाळ्यात जगबुडी नदीला येणाऱ्या भरतीमध्ये पुराचा बसणारा फटका बसू नये, म्हणून नदी पात्रातील गाळ उपसण्यासह बेटे काढण्याचे काम राज्य सरकारने गेल्या वर्षापासून हाती घेतले असून, गतसाली पावसाळा सुरू होण्यापूर्वी थोडे दिवस आधीच या कामाला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे प्रभावीपणे हे काम होऊ शकले नव्हते. परंतु, ना. योगेश कदम यांनी या कामासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच २ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली होती. आता सोमवार, ३ रोजी गाळ काढण्याच्या कामाची २ कोटी ८४ लाखांचा निधी चाचणी घेतली. प्रत्यक्ष हे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.
जगबुडी नदीपात्रातील पूरमुक्त खेड शहराची संकल्पना सत्यात उतरण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. खेड शहर जगबुडी व नारिंगी या दोन नद्यांच्या किनाऱ्यावर वसले आहे. त्यामुळे पुराचा मोठा फटका शहराला बसतो. अनेक वर्षांपासून सह्याद्रीच्या रांगातून जगबुडी नदीने वाहून आणलेला गाळ नदीच्या या भागातील पात्रात साचला आहे.
गेल्या दहा वर्षांत नदीतील गाळनकाढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गतवर्षी गाळ काढण्याच्या कामाला शासकीय यंत्रणांनी हिरवा दिवा दाखवला. मात्र, निधी मंजुरी व परवानग्या पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असताना मिळाल्याने कामाबाबत शंका उपस्थित केली जात होती. जलसंपदा विभागाच्या आलोरे यांत्रिक विभागाने कामाला गती दिली. दररोज सुमारे दोनशे ब्रास गाळ उपसा सुरू होत होता. पावसाळा पूर्णपणे सुरुवात होईपर्यंत हे काम सुरू होते. परंतु पावसाळा सुरू झाल्यावर काम थांबले मात्र, निधी मंजूर असल्याने हे काम नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु निवडणुका व अन्य कामांमध्ये यंत्रणा गुंतून पडल्या व गाळ काढण्याच्या कामाला मार्च २०२५ उजाडला तरी आरंभ झाला नाही.
गेल्या वर्षी सुमारे पाच हजार घनमीटरपेक्षा जास्त गाळ उपसा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या कामासाठी अलोरे जलसंपदा यांत्रिकी विभागातर्फे आगामी काही दिवसांत दोन पोकलेन यंत्र व काही डंपर वापरून गाळ उपसण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी नदीपात्रातून उपसण्यात आलेला गाळ न.प. च्या हद्दीतील राखीव भूखंडावर टाकण्यात आला आहे.
कामासाठी निधी कमी पडणार नाही: मंत्री योगेश कदम
गृहराज्य मंत्री योगेश कदम जगबुडी नदीतील गाळ उपसा करून खेड शहराला पूरमुक्त बनवण्यासाठी आग्रही असून, या कामासाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही, असे त्यांनी आश्वासन त्यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमातही दिले आहे. त्यामुळे यावर्षी गाळमुक्त नदी व पुरमुक्त शहर हे स्वप्न यावर्षी पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.










