कोकणात ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का; ठाकरे नगराध्यक्षांवर येणार अविश्वास ठराव

दापोली l प्रतिनिधी* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना कडून ऑपरेशन टायगर सुरू आहे. शिवसेना नेते रामदास कदम व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का जाण्याची तयारी पूर्ण केली आहे. उद्धव ठाकरे व अनिल परब यांच्या पुढाकाराने दापोली नगरपंचायतीत स्थापन झालेल्या सत्तेला हादरा बसला आहे. आता लवकरच ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावर अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. यासाठी जिल्हाप्रशासनाला मंगळवारी 4 मार्च रोजी पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता दापोलीत नगरपंचायतीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष बदल हे निश्चित झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी कृपा घाग तर उपनगराध्यक्ष पदासाठी विलास शिगवण यांचं नाव चर्चेत आहे. आता प्रशासनाकडून लवकरच बैठक लावण्यात आल्यानंतर हा ठराव पारित केला जाणार आहे

 

14 नगरसेवकांच्या गटप्रमुख शिवानी खानविलकर, नगरसेवक विलास शिगवण ,अझीम चिपळूणकर व शहर प्रमुख पप्पू रेळेकर यांनी हे पत्र मंगळवारी रत्नागिरीत येथे जाऊन जिल्हा प्रशासनाला दिल आहे.

 

दापोली नगरपंचायतीत उद्धव ठाकरे व अनिल परब यांनी तीन वर्षांपूर्वी रामदास कदम व आ. योगेश कदम यांना शह देण्यासाठी स्थापन केलेली सत्ता आता उलथून टाकण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. ठाकरे गट व शरद पवार गटाचे नगरसेवकांनी एकत्र येऊन 14 जणांचा एकत्र गट स्थापन करून चार दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या युवा नगरसेविका शिवानी खानविलकर यांच्याकडे या गटाचे नेतृत्व आहे. मात्र यामध्ये ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांचा समावेश नसून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

 

 

उद्धव ठाकरे यांचे उजवा हात असलेले अनिल परब यांच्या पुढाकाराने तीन वर्षांपूर्वी रामदास कदम व आमदार योगेश कदम यांना शह देण्यासाठी दापोली नगरपंचायतीवर ठाकरे गटाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता स्थापन केली होती. सत्ता स्थापन केल्यापासून ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे व उपनगराध्यक्षपदी खालीद रखांगे हे या पदावर आहेत. यातील ठाकरे गटाचे असलेले उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यावर आता उपनगराध्यक्षपदही बदलले जाणार आहे

 

 

*नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदासाठी दोन नावे चर्चेत*

 

नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावर विश्वास ठराव आणल्यावर आता शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका कृपा घाग व शिवानी खानविलकर यांचं नाव चर्चेत आहे. नगराध्यक्षपद हे एक एक वर्षासाठी दिले जाऊ शकत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले ज्येष्ठ कार्यकर्ते व नगरसेवक विलास शिगवण हे उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत व त्यांनी या पदावर आपला दावा सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या दोन्ही पदांवर कोणाला संधी दयायची याचा निर्णय शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम घेणार आहेत. त्यामुळे आता या बदलाकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.