पुर्ये तर्फे देवळे खालची वाडी येथील विहरीत पडलेल्या गवारेड्याचा अखेर मृत्यू

शंकर वैद्य l साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे खालचीवाडी येथे मंगळवारी सायंकाळी 6 वाजता गवारेडा विहरीत पडला. पाण्याचा व गवारेड्याच्या आवाजाने शेजारील लोक जमा झाले होते. त्यानंतर वनविभागाला घटनेची खबर देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विहरीची उंची सुमारे 30 फूट होती व पाणी 10-12 फूट होते.

त्यामुळे तो काही काळ पाण्यावर तरंगत होता. पुर्ये खालचीवाडी व परिसरातील नागरिक वनविभागाच्या मदतीला होते. त्याचबरोबर पोलीस खात्याचे कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.मात्र काही काळानंतर थकल्याने व वरती तरंगु न शकल्याने तो रात्री 10 च्या दरम्याने पाण्यात बुडाला व मरण पावल्याचे वनविभाग यांच्यावतीने सांगण्यात आले.

त्यानंतर एवढ्या जड वजनाच्या गवरेड्याला बाहेर काढणे कठीण काम होते. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व हायवे कंपनीच्या क्रेनने मोठ्या जिकरीने त्याला बाहेर काढण्यात आले. बुधवारी सकाळी 11:30 वाजता पशुवैद्यकीय डॉक्टर सोनाली शेटे यांनी शवविच्छेदन करून पंचनामा करण्यात आला. येथीलच नदीकिनारी गवारेड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी संगमेश्वर तालुका वनपाल श्री तौफिक मुल्ला, वनरक्षक श्री कराडे, सुरज तेली, आकाश कडुकर, श्री माळी ए. एम. यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी येथील लाकूड व्यापाऱ्यांनी लाकडाची मदत केली तसेच पप्पू गांधी यांनी आपल्या क्रेनच्या सहाय्याने सहकार्य केले.

यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी गवा रेड्याला विहिरीतून बाहेर काढून शेवटच्या क्षणापर्यंत वनविभागाला मोलाची मदत केली मदत केली.