रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर कासवांनी अंडी घालण्यास सुरवात केल्याने या किनाऱ्यावर कासव संवर्धन केंद्र तयार केले आहे. यावर्षी तब्बल २१ घरटी संरक्षित केली असून, सुरवातीच्या घरट्यातून पिल्ले बाहेर पडली असून, त्यांना समुद्रात सोडण्यात आले.
गेली दोन वर्षे गणेशगुळे किनाऱ्यावर कासवांनी अंडी घालण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे कासवमित्र सचिन तोडणकर यांनी वनविभागाच्या माध्यमातून कासव संवर्धन केंद्र तयार केले आहे. किनाऱ्यावर कासवांनी अंडी घातल्यानंतर ती अंडी प्राण्यांच्या व माणसाच्या हाती लागू नये यासाठी त्याचे संरक्षण केले जाते. या घरट्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना समुद्रात सोडले जाते. यावर्षी जानेवारीमध्ये ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घालण्यास सुरवात केली. आतापर्यंत २१ घरटी या किनाऱ्यावर संरक्षित करण्यात आली असून काही पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे. येत्या आठ-दहा दिवसानंतर येथील घरट्यातून मोठ्या प्रमाणात पिल्ले समुद्रात सोडण्यात येणार आहेत.










