कोदवली पेट्रोलपंप येथील सचिन गुरव यांचे निधन

राजापूर | वार्ताहर : शहरानजीकच्या कोदवली पेट्रोलपंप गुरववाडी येथील रहिवासी व संजय टी स्टॉलचे मालक सचिन सिताराम गुरव (४७) यांचे सोमवारी २७ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने अकाली निधन झाले.
गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात उपचारही सुरू होते. मात्र सोमवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
काँग्रेसचे दिवंगत कार्यकर्ते सिताराम गुरव यांचे ते सुपुत्र होत.  कोदवली पेट्रोलपंप नजीक त्यांचे संजय टी स्टॉल हे चहा नास्ताचे हॉटेल आहे. वडिलांनी सुरू केलेला हा हॉटेल व्यवसाय सचिन व त्यांचा लहान भाऊ संजय हे प्रामाणिकपणे सांभाळत होते. या व्यवसायाच्या माध्यमातुन त्यांनी मित्र परिवार जोडला होता. प्रारंभी काही काळ त्यांनी रिक्षा व्यवसायही केला होता. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी त्यांच्या कोदवली येथील निवासस्थानी धाव घेतली व गुरव कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर सोमवारी दुपारी कोदवली स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.