कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्गदर्शक नारायण नानिवडेकर यांचे दुःखद निधन

रत्नागिरी | प्रतिनिधी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे जेष्ठ मार्गदर्शक आणि माजी कार्यवाह नारायण महादेव नानिवडेकर यांचे आज दिनांक 26 मार्च रोजी वयाच्या 86 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज बुधवारी सायंकाळी सहा वाजता उत्कर्ष नगर येथील त्यांच्या निवासस्थानातून निघणार आहे. चर्मालय येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

स्वर्गीय नानिवडेकर हे कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघात सन 2011 ते 2014 या कालावधीत कार्यवाह म्हणून कार्यरत होते. ज्येष्ठांना संघटित करून ज्येष्ठ नागरिक चळवळीला प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले. विशेष म्हणजे रविवार दिनांक 23 मार्च रोजी ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या धार्मिक पर्यटन सहलीमध्ये ते उत्साहाने सहभागी झाले होते. रत्नागिरी येथील मत्स्य व्यवसाय खात्यात सेवा बजावताना राज्य शासकीय कर्मचारी संघटनेच्या कामात महत्त्वपूर्ण सहभाग दिला होता. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी ज्येष्ठ नागरिक चळवळीला वाहून घेतले होते. त्यांच्या निधनाने कुवारबाव परिसर संघाचा अनुभवी मार्गदर्शक आणि उत्साही आधारस्तंभ हरपला आहे.