रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील आगवे येथील बीएसएनएल टॉवरचे तब्बल 35 हजारांचे 902 किलो वजनाचे लोखंडी अँगल व प्लेटस अज्ञाताने चोरुन नेले. ही घटना सोमवार 28 जुलै ते मंगळवार 29 जुलै रोजी दुपारी 12 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत नवाजिश फरमद अली (35,मुळ रा.चंदौरा सिवल मेरठ उत्तरप्रदेश सध्या रा.जाकादेवी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, आगवे गावचे सरपंच रमेश गुणाजी मालप यांच्या मालकीच्या जागेत हा बीएसएनएल टॉवर बसवण्याचे काम सुरु होते. टॉवरसाठी लागणारे 902 किलो वजनाचे लोखंडी अँगल आणि प्लेटस मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते. फिर्यादी नवाजिश अली हे 29 जुलै रोजी ते सामान घेण्यासाठी गेले असता त्यांना टॉवरचे सामान दिसून आले नाही. ते चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












