आंबोलीत अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराच्या पिल्लाचा मृत्यू

आंबोली । प्रतिनिधी : रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराच्या पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. आंबोली जकातवाडी येथे बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. या अपघाताची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत या मृत सांबराच्या पिल्लाला ताब्यात घेऊन त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. आंबोली जकातवाडी येथील अनिल चव्हाण यांच्या घरालगत हा प्रकार घडला. रस्ता ओलांडताना एका सांबराच्या पिल्लाला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने ते खाली कोसळले. वाहनाचे चाक त्या पिल्लाच्या पायावरून गेल्याने तसेच जोरदार धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत अनिल चव्हाण यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर रेक्यू टीमचे कर्मचारी प्रथमेश गावडे, राकेश अमृस्कर , वसंत गावडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून मृत सांबर ताब्यात घेतले. यानंतर वनविभाग कार्यालयाजवळ नेऊन त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.