सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी कारागृहामागील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी या स्मारकाला भेट देऊन महाराजांना अभिवादन केले.
नागरिकांच्या सक्रिय सहभागातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे हा भव्य पुतळा साकारण्यात आला आहे. पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आज रात्री उशिरा या ठिकाणी भेट दिली. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदराने नमन केले. यावेळी शंभूराजांसमोर नतमस्तक होत त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, विनायक रांगणेकर, दिनेश गावडे, कृष्णा धुळपनवर, श्रीकृष्ण सावंत, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, गुरूनाथ मठकर, साईराज नार्वेकर, बंटी जामदार, शुभम घावरे, कुणाल शृंगारे, बंटी पुरोहित, लादू रायका, साईश परब यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, अनेक महिला भगिनींनीही या अभिवादन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.












