Washim Crime News: किरकोळ वाद विकोपाला; बापानं पोटच्या पोराला संपवलं, घटनेनं वाशिम हादरलं!

Washim Crime News : वाशिमच्या कारंजा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारंजा बायपास रोड वरील प्रगती नगर भागात बापानेच पोटच्या गोळ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून बापाने आपल्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. तर हत्यारा बापाला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शेती आणि संपत्तीच्या वादातून हत्या? चर्चेला उधाण

पुढे आलेल्या माहितीनुसार, वाशिमच्या कारंजा शहरातील कारंजा बायपास भागात असलेल्या बाप लेकाच्या किरकोळ वादातून संतप्त बापाने पोटच्या गोळ्याच्या पोटात चाकूने वार घालून हत्या केलीय. ही घटना आज(12 एप्रिल) सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर हत्यारा बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृत मुलाचं नाव अनिल मोकडकर (वय 40) असं आहे. तर मृतक अनिल हा नेहमी मद्यप्राशन करून घरातील सदस्यांसोबत वाद घालत असायचा. मात्र आज क्षुल्लक कारणावरून बाप गोपाल मोखडकर आणि अनिल यामध्ये वाद निर्माण झाला आणि वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात बापाने पोटच्या गोळ्याच्या पोटात चाकूने भोसकून अनिलची हत्या केल्याच कळते आहे. कारंजा शहर पोलिसांनी आरोपी बापास ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची चौकशी कारंजा शहर पोलीस करत आहे. मात्र दुसरीकडे, शेती आणि संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगत आहे.

शासनाची आर्थिक फसवणूक करून गुन्हेगारी स्वरूपाचा कट, अधिकाऱ्याला अटक

सेवापुस्तिकेत नोंद, जन्मतारखेत खाडाखोड करून दोन वर्षे अधिक सेवा उपभोगून शासनाची आर्थिक फसवणूक करून गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्या प्रकरणी अखेर चौकशीच्या 24व्या दिवशी ‘फ्रॉड’ डीआरटीओ राज बागरी याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याचा जामीन नाकारल्याने शुक्रवारी त्याची येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान बागरीच्या न झालेल्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी नागपुरातून ताब्यात घेतले होते. मात्र अनेकदा चौकशीस बोलावल्या नंतर त्याला अटक केली नव्हती. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.