मडूरा बाबरवाडीत शॉर्टसर्किटने आग लागून ५०० काजू कलमे भस्मसात

महावितरणचा गलथान कारभार

बांदा l प्रतिनिधी :   महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मडूरा बाबरवाडी येथील डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन काजू बागायतीला भीषण आग लागली. या आगीत सुमारे ५०० हून अधिक काजू कलमे, आंबा, नारळाची रोपे जळून खाक झालीत. स्थानिकांच्या अथक प्रयत्नांती तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग विझविताना नेत्रा नाईक या गंभीर जखमी झाल्या. महावितरण कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे सदर आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला. जोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. सदर आग आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लागली.

 

या दुर्घटनेत पुंडलिक धुरी, नेत्रा नाईक, राधाबाई नाईक या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी प्रकाश वालावलकर, सागर धुरी, लक्ष्मण नाईक, सुवर्णा धुरी, सान्वी धुरी, रमाकांत धुरी, अशोक धुरी, दीप्तेश धुरी, भरत परब, नेत्रा नाईक, पुंडलिक धुरी, अस्मिता धुरी, अर्चना धुरी, मधुकर धुरी, अभिमन्यू धुरी आदींसह स्थानिक ग्रामस्थांनी मेहनत घेतली. आगीची माहिती देऊनही महावितरणचे कर्मचारी दुपारपर्यंत घटनास्थळी न आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.