ऐन उन्हाळ्यात शहरातील पाणी पातळी खालावली
पाणी सोडल्याने स्वच्छंदी बदके निवार्याच्या शोधात
सावंतवाडी । सचिन रेडकर : सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावातील गाळ उपसा
करण्यासाठी आता चक्क पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाची लगीन घाई सुरु झाली आहे. उशिराने सुचलेले शहाणपण त्याला म्हणावे लागेल. गाळ काढण्यासाठी तलावातील संपूर्ण पाणी सोडल्याने ऐन उन्हाळ्यात शहरातील पाण्याची पातळी खालावल्याने नागरिकांसमोर महा संकट उभं ठाकलं आहे. पाऊस लांबणीवर गेल्यास गाळ उपसा मोहीम फत्ते होईल कदाचित पण पाणीटंचाईचे मोठे संकट नागरिकांसमोर उभे राहील हे नक्की !
मोती तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी अवजड मशिनरी उभ्या केल्याने रुग्णालयासमोरील संरक्षक भिंत कोसळली. करोडो रुपये खर्च करून ती पून्हा बांधण्यात आली. मात्र, ते काम चालू असतानाच गाळ काढण्याचे काम सुरू न करता आता चक्क पावसाच्या तोंडावर प्रशासनाने हे काम हाती घेतले आहे. नुकताच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या गाळ उपसा मोहीमेस शुभारंभ करण्यात आला.
उशीरानं गाळ उपसा होत असल्यानं व तलाव आटवल्यान शहरातील विहीरींनी तळ गाठल्याने नागरिकांत नाराजी आहे. त्यातच आज पूर्णतः पाणी सोडल्यानंतर या तलावातील बदकांच काय, त्यांना वाली कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत ही बदक उन्हाचे चटके सोसत आहेत. मुख्य तलाव परिसरातील उरल सुरल पाणी देखील सोडल्यामुळे पाणी असणाऱ्या भागात विहार करणाऱ्या बदकांची अवस्था न बघण्यासाठी झाली आहे.
सावंतवाडी शहराचं सौंदर्य असणाऱ्या मोती तलावात तत्कालीन नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यकाळात चार बदकं सोडण्यात आली होती. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला होता. सावंतवाडी तालुका पर्यटन व्यवसायिक महासंघाने याबाबतची मागणी संजू परब यांच्याकडे केली होती. या उपक्रमाच सावंतवाडीकरांकडून तसेच पर्यटकांकडूनही कौतुक झालं होतं. पर्यटकांना देखील तलावात मुक्त संचार करणारी बदकं भुरळ घालत होती.
दरम्यानच्या काळात भाजपाचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवीत तब्बल आठ बदकं स्वखर्चाने तलावात सोडली होती. त्यामुळे एकुण १२ बदकांचा मुक्त व विहंगम संचार तलावाच सौंदर्य वाढवत होता. नगरपालिका, न्यायालय परिसर, विसर्जन ठिकाण, आरपीडी परिसर, केशवसुत कट्टा आदी परिसरात ही बदकं मुक्तपणे विहार करताना दिसून येत होती. परंतु, बदकांच्या या स्वच्छंदी भ्रमंतीला ग्रहण लागलेच.
गाळ उपसा मोहिमेसाठी तलावातील पाणी सोडल्यामुळे खालवलेली पाणी पातळी यामुळे ही बदक निदर्शनास येत नव्हती. प्रशासकीय राजवटीत मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडून देखील त्यांची निगा राखली गेली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात तापलेल्या पाण्यातच या बदकांनी वास्तव्य केलं. आता पाणी पूर्णपणे सोडत गाळ उपसा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु, या बदकांचा विचार प्रशासनानं केलेला दिसून येत नाही आहे. बदकांसाठी केलेला पिंजऱ्यास देखील कुलुप असून तलावात वाढलेल्या झाडीत ही बदक आश्रय घेत आहेत. त्यांची झालेली अवस्था बघवत नाहीय.
सद्यस्थितीत १२ पैकी केवळ ७ बदक पाण्यात दिसून येत आहेत. नवे मुख्याधिकारी सागर साळुंखे हे नुकतेच हजर झाल्यानं कदाचित ह्या बदकांबद्दल त्यांना कल्पना नसेल. मात्र, या प्रकाराबद्दल व प्रशासनाच्या बदकांकडील दुर्लक्षाबद्दल सामाजिक कार्यकर्ते अमित परब यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बदकांची तातडीनं नगरपरिषदेच्या माध्यमातून सोय करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत सावंतवाडी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना कल्पना देत बदकांबद्दल विचारपूस केली असता त्यांच्याकडून या बदकांची उपययोजना करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या असल्याचे सांगितले.
गाळ उपसा दरम्यान या बदकांची सोय नगरपरिषद करणार असल्याचं नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.












