खेड अपघातात पराडकर कुटुंबातील तिघांचाही मृत्यू
आई मुलासह वडिलांचेही उपचारादरम्यान निधन
नालासोपारा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड भरणे ब्रिज येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर इतर जखमी झालेले परमेश पराडकर यांचा उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी उशिरा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या भीषण व दुर्दैवी अपघातातील मृत्यू झालेल्यांची संख्या सहा झाली आहे. या अपघातात पराडकर कुटुंबातील तिघांनाही आपला जीव गमावला असून हे कुटुंब उध्वस्त झाले आहे.
परमेश पराडकर हे उत्कृष्ट चालक होते. ओला उबेर या गाड्यांवरही ते मुंबईमध्ये चालक म्हणून काम करत असत. त्यांची पत्नी मेधा पराडकर या पिझ्झा बर्गर यासारख्या खाद्यपदार्थांची विक्री व्यवसाय करत होत्या. त्यांनी नालासोपारा येथे खाद्यपदार्थ विक्रीची गाडीही सुरू केली होती. याशिवाय त्या अनेकांना जेवणाचे डबे देत असत. तर परमेश पराडकर हे वाहन चालक म्हणून काम करून आपलं कुटुंब चालवत होते. पराडकर कुटुंबीय नालासोपारा येथे अनेकांना परिचित होते सुस्वभावी मेहनती मदतशील कुटुंब म्हणून ते ओळखले जात. या कुटुंबातील परमेश पराडकर, मेधा पराडकर व सौरव पराडकर या तिघांचं या दुर्दैवी भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या पराडकर यांचा मुलगा सौरव परमेश पराडकर वय 23 याला दोन ते तीन वर्षांपूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी लागली होती. हे कुटुंब आनंदाने संसार करत होत मात्र गावी निघालेल्या या कुटुंबावर काळाचा आघात झाला आहे निष्ठूर नियतीने डाव साधला आहे. अलीकडेच पराडकर यांनी नालासोपारा येथे नवीन फ्लॅटही घेतला होता. त्यांच्याकडे नाही मित्रपरिवार तसेच नालासोपारा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
देवरुख येथील मोहन चाळके यांचे रविवारी गावी निधन झालं त्यांच्या अंत्ययात्रेसाठी मोरे व पराडकर कुटुंब निघाल होतं. या अपघातात मृत्यू झालेल्या मेधा पराडकर या मोहन चाळके यांची मानस कन्या होत्या. या भीषण अपघातातील मृत्यूच्या तांडवाने रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख व मुंबईतील नालासोपारा परिसरावर शोककाळा पसरली आहे. पराडकर कुटुंबातील या तिघांवरही आज नालासोपारा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. पराडकर कुटुंबीयांच्या जाण्याने मित्रपरिवार अनेक नागरिक यांच्याकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. परमेश पराडकर यांच्या पश्चात आई ,भाऊ ,बहीण असा परिवार आहे.











