मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन
राजापूर l प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले राजापूर शहर अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या काठावर वसलेले आहे. मात्र जलसंपदा विभागाकडून सन २०२२ मध्ये नव्याने आखण्यात आलेल्या जाचक अशा पुररेषेमुळे राजापूर शहराच्या सर्वांगिण विकासाला खिळ बसली आहे. या नव्या पुररेषेमुळे शहर वासीयांना भविष्यात कोणतेही बांधकाम करणे शक्य होणार नाही अशा प्रकारे नवीन पुररेषा नागरिकांवर लादण्यात आली आहे. त्यामुळे राजापुर शहरातील या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करावे अशी मागणी राजापूर तालुका भाजपा पश्चिम मंडळ अध्यक्ष मोहन घुमे यांनी केली आहे. याबाबतचे एक लेखी निवेदन घुमे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले राजापूर शहर अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या काठावर वसलेले आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याअभावी कोरड्याशुष्क असलेल्या या दोन्ही नद्यांना पावसाळ्यामध्ये सातत्याने पूर येतो. नद्यांना आलेल्या पूराचे पाणी राजापूर शहरामध्ये घुसून राजापूर शहर पूरमय होवून जाते. सातत्याने उद्भवणाऱ्या या पूरस्थितीमुळे राजापूर शहरामध्ये जपसंपदा विभागाकडून पूररेषा निश्चित करण्यात आलेली आहे. सुरूवातीला २००८ मध्ये निश्चित केलेल्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण होवून ती २०२२ मध्ये पुन्हा एकदा पूररेषा निश्चित करण्यात आली आहे.
नव्याने म्हणजे २०२२ मध्ये पूररेषा निश्चित करताना आगामी सुमारे शंभर वर्षातील संभाव्य पूरस्थितीचा विचार करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्याच्यातून, ज्या भागामध्ये पूराचे पाणी पोहचत नाही त्या भागाचाही पूररेषेमध्ये समावेश झालेला आहे. त्यातून, निश्चित करण्यात आलेली पूररेषा शहर विकासामध्ये अडचणीची ठरत आहे. सद्यस्थितीचा विचार करता पूरस्थितीला कारणीभूत असलेला अर्जुना कोदवली नदीपात्रातील गाळाचा शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध झालेल्या निधीसह लोकसहभागातून निधी उभारून गाळ उपसा करण्यात आला आहे. या गाळ उपशानंतर पूरस्थितीची तीव्रता कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून २०२२ मध्ये निश्चित करण्यात आलेली पूररेषा प्रथमदर्शनी चुकीची वाटत आहे. त्यामुळे २०२२ मध्ये निश्चित करण्यात आलेल्या राजापूर शहरातील पूररेषेचे फेरसर्वेक्षण करावे व हे फेरसर्वेक्षण करताना स्थानिक नागरिक, व्यापारी व लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेवून, लोकांच्या हकरती मागवून त्यावर विचारविनिमिय होवून नव्याने पूररेषा निश्चित व्हावी अशी सर्वसामान्य राजापूरवासियांची अपेक्षा आहे. याबाबत शासनस्तरावर सकारात्मक विचार होवून राजापूर शहरामध्ये पूररेषेच्या फेरसर्वेक्षणाबाबत योग्य तो विचार व्हावा अशी मागणी या निवेदनात घुमे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना हे निवेदन घुमे यांनी दिले आहे.











