सावंतवाडी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर

वादळी वाऱ्यामुळे घरांवर झाडे पडून मोठे नुकसान

गटारे तुंबली : रस्त्यांचेही नुकसान 

वीज पुरवठा खंडित : महावितरण सेवेचा बोजवारा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हाहाकार माजवला असून, वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामीण भागाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत, तर गटारे तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहेत आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.

घरांचे मोठे नुकसान

या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे घरांवर कोसळली आहेत. यामुळे काही घरांचे छत पूर्णपणे उडून गेले आहे, तर काही घरांच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत.

नुकसानग्रस्तांमध्ये डेगवे जांभळवाडी येथील दत्ताराम बाबलो सुतार यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराच्या छताला आणि भिंतींना मोठा धक्का बसला आहे.

तर सातार्डा भटवाडी येथील संतोष कवठणकर यांच्या नवीन घरावर भेंडीचे झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे.

चराठा येथील भिवादाजी गोसावी यांच्या घरावरही झाड पडून अंदाजे ९,९५० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

*दळणवळण ठप्प : वीजपुरवठा खंडित*

वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज खांब उन्मळून पडल्याने ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. यामुळे दळणवळणावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून त्यांना भेगा पडल्या आहेत. गटारे तुंबल्याने रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने काही ठिकाणी रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे स्थानिक बाजारपेठेतील व्यवहारही मंदावले आहेत.

 

*तातडीने मदतकार्याची मागणी*

मान्सूनपूर्व पावसाने केलेल्या या कहरामुळे शेतीतही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडून प्रशासनाकडे नुकसानग्रस्त भागांची तातडीने पाहणी करून मदतकार्य सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या संकटकाळात प्रशासनाने तातडीने पाऊले उचलून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.