महावितरणच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह : तीव्र संताप व्यक्त
सावंतवाडी । प्रतिनिधी : मान्सूनपूर्व पावसाने सावंतवाडी तालुक्यात हाहाकार माजवला असून, महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा बोजवारा उघड झाला आहे. ग्रामीण भागात वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, शहरातही विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच ही परिस्थिती असल्याने नागरिक संतप्त झाले असून, महावितरणच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वेळेत दुरुस्ती न केल्याने परिस्थिती बिकट
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी दुरुस्तीची कामे (मेंटेनन्स) वेळेत न केल्यानेच ही परिस्थिती ओढवल्याचे बोलले जात आहे. पहिल्याच मान्सूनपूर्व पावसाचा जोर जास्त असल्याने महावितरणला दुरुस्तीची कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी झाडे वीज वाहिन्यांवर तुटून पडली आहेत, तर काही ठिकाणी उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक वीज खांब (पोल) आणि वाहिन्या तुटल्या असून, अनेक डीपी (वितरण बॉक्स) बंद पडले आहेत. काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान झाले आहे. आतापर्यंत अंदाजे ५ ते ६ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मनुष्यबळाअभावी वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी
महावितरणकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी ठेकेदारांवरच महावितरणची भिस्त असल्याने कामाचा वेग मंदावला आहे. सोनुर्ली आणि मळगाव भागांत तर गेली दोन-दोन दिवस वीज गायब असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. इतर काही गावांतही विजेचा लपंडाव सुरू असून, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणे चालवणेही कठीण झाले आहे.
महावितरणकडून नेहमीचीच उत्तरे
वीजपुरवठ्याबाबत विचारणा केली असता, महावितरणचे अधिकारी ‘काम सुरू आहे, थोडा वेळ लागेल,’ अशी नेहमीची उत्तरे देत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. वीज नसल्याने पाण्याच्या मोटारी बंद राहिल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शहरातही अनेक कार्यालयांमध्ये वीजपुरवठा नसल्याने कामे ठप्प झाली आहेत.
या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महावितरणने तातडीने उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. अन्यथा, पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.












