को रे मार्गावर दुसऱ्या दिवशीही ६ रेल्वेगाड्यांना विलंब

खेड (प्रतिनिधी)
कोकण मार्गावरून धावणाऱ्या ६ रेल्वेगाड्यांना दुसऱ्या दिवशीही ‘लेट’ धावल्या . मुसळधार पावसामुळे वेळापत्रक विस्कळीत झाले असून प्रवाशांना फटका बसत आहे. बिघडलेले वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.
मंगळूर-उधना स्पेशल १ तास ४५ मिनिटे, तर सावंतवाडी-दिवा पॅसेंजर १ तास उशिराने रवाना झाली. एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस २ तास १५ मिनिटे, तर तिरुवअनंतपूरम-एलटीटी गरीबरथ २ तास ४० मिनिटे विलंबाने धावली. एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस १ तास, तर तिरुवनेलवेली-गांधीधाम हमसफर १ तास १० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. हा अपवाद वगळता उर्वरित सर्व रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत रवाना झाल्या. कोकण मार्गावरुन धावणारी एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस ४-५ दिवसांपासून विलंबाने सुटत असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. शुक्रवारीही १११०० क्रमांकाची मडगाव-एलटीटी एक्स्प्रेस दुपारी १२.३० ऐवजी दुपारी २.३० वा. सुटल्याने प्रवाशांना स्थानकात तिष्ठत बसावे लागले. एक्स्प्रेस उशिराने धावण्यामागचे नेमके कारण समोर आलेले नाही.