अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचे प्रतिपादन
चिपळूणात क्षत्रिय मराठा समाजाचा कोकण विभागीय मेळावा
चिपळूण | संतोष सावर्डेकर – पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथील लोक ओबीसी प्रमाणपत्र घेऊन आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मात्र, कोकणामध्ये परिस्थिती उलट आहे. जातींच्या नोंदीमध्ये मराठा आणि कुणबी वेगळ्या जाती आहेत. कुणबीमध्ये ५५ प्रकार आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मराठा-कुणबी तो वेगळा आहे. कोकणात मराठा व कुणबी सरळ -सरळ वेगळे आहेत. त्यामुळे इथे मराठयांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही, ती तांत्रिक अडचण आहे आणि ते मिळणार नाही. यामुळे स्वतंत्र मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी चिपळूणमधील क्षत्रिय मराठा समाजाच्या कोकण विभागीय मेळाव्या प्रसंगी करतांना पर्याय देखील सुचवले आहेत. यावेळी मराठा समाज बांधवांनी स्वतंत्र मराठा आरक्षणाचा एल्गार पुकारला आहे. हा मेळावा चिपळूण शहरातील कालभैरव देवस्थान प्रांगणाच्या कै. बापू सागावकर मैदानात झाला.
यावेळी ते म्हणाले की, आरक्षण सवलत या दोन बाबी आहेत. त्या आपण समजून घेतले पाहिजे. मराठा समाज विधी, धोरणाने आणि मेंदूने साक्षर होणे गरजेचे आहे. कारण जगाच्या पाठीवर प्रगत समाज पुढच्या २५ वर्षांचा विचार करतो. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, असा मूलमंत्र दिला. तर आपली सूत्रं काय ? तर माझं नाव पत्रिकेत टाकलं नाही, मला विचारले नाही, मला बोलावले नाही, अशी सूत्रं भयानक आहेत. याचा मराठा समाजाने विचार करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
कोकणवासीयांनी कोकण विकायचं ठरवलंय की काय?
मराठा समाजाच्या काही एकरात जागा होत्या. त्या गुंठ्यावर आल्या आहेत. कोकणाबद्दल बोलायचं म्हटलं तर इथल्या कोकणवासीयांनी कोकण विकून टाकायचे ठरवले की काय? असा सवाल उपस्थित केला. मराठा समाजाने मोगल- निजामांशी संघर्ष करून जागा मिळवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली भूमी जपली आणि ती भूमी आपण जपली पाहिजे. मराठा समाजाचे अस्तित्व जे आहे ते फक्त राजकारणात नसून इथल्या जमिनीवर आहे. जोपर्यंत तुमच्या ताब्यामध्ये जमीन आहे, तोपर्यंत तुमचे अस्मिता आहे. ती अस्मिता टिकवायची असेल तर लँड व जॉबलेस होता कामा नये, असा मराठा समाज बांधवांना कोंढरे यांनी सल्ला दिला.
एकमेकांचा द्वेष करू नये
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटनात्मकदृष्ट्या समानता अपेक्षित होती. ती धोरणांमध्ये कुठेतरी कमी पडते ती समानता प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजात संवाद आणण्यासाठी समजदार नेतृत्वानी आपला समाज पुढे नेत असताना एकमेकांचा द्वेष न करता प्रत्येकाला प्रगतीची संधीच्या साधनांची जी उपलब्धता आहे, ती उपलब्ध करून समाज पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले.
जे मराठा त्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळणे अपेक्षित!
ज्यांच्या सर्टिफिकेटवर पहिल्यापासून मराठा आहे आणि आजही मराठा आहे त्यांना सुद्धा मराठा म्हणूनच आरक्षण मिळणे अभिप्रेत आहे आणि ते मिळण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आता जो राज्य मागासवर्ग सर्वेक्षण करतोय या सर्वेक्षणावर मराठा समाज बांधवांनी गंभीरपणे विचार करून त्या प्रश्नावलीला उत्तरे द्यावीत, असे आवाहन केले. आपल्याला शेतीबरोबर इतर क्षेत्रांमध्ये प्रगतीची दालने विकसित करावी लागतील आणि ते खरं आपलं जन आंदोलन असेल. त्या जनआंदोलनामध्ये सध्या महाराष्ट्राने जसं आता एक वादळ पाहिलं, तशाच प्रकारजी जी गर्दी आहे ती दिशा एकमेकांना सगळ्यांनी द्यावी असे आवाहन केले.
प्रस्ताविकात सुधीरराजे भोसले यांनी सांगितले की, मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या, अशी मागणी पुढे आल्यानंतर आम्ही संभ्रमात पडलो. कोकणातील मराठा समाज बांधवांना स्वतंत्र आरक्षण म्हणून मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनी आरक्षण घ्यावे त्यास आमचा विरोध नाही. सरसकट कुणबी आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही कोकणातील मराठा समाज कुठे जाणार ? असा सवाल भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.
राजन घाग आपल्या मनोगतात म्हणाले की, आता आमच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे, म्हणून आम्ही बाहेर पडलो आहोत. कोकणात कुणबी- मराठा वाद नाही. आम्ही दोन्ही समाज बांधव गुण्यागोविंदाने नांदत आहोत. आम्ही एकमेकांचा आदर करतो. मराठा ही जात टिकवायची असेल तर मराठा समाज टिकला पाहिजे. आपण स्वाभिमान जपला पाहिजे, असे आवाहन केले. तर आरक्षण घेऊ ते फक्त मराठा म्हणूनच घेऊ, असा एल्गार देखील यावेळी पुकारला.
यावेळी माजी मंत्री रवींद्र माने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण, प्रभाकर जाधव, आप्पा खानविलकर अजित साळवी, सुभाष जाधव, बाळा कदम, अशोक जाधव, शिवानी पवार, बळीराम शिंदे, विजयसिंह महाडिक, मधुकर दळवी, तुळशीराम पवार, रामदास राणे, स्नेहा जावकर आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढारे यांनी सुचवले पर्याय
यावेळी राजेंद्र कोंढारे यांनी मराठा आरक्षणाबाबत चार पर्याय सुचवले आहेत. यामध्ये मराठा समाजाला ओबीसींच्या आरक्षणामध्ये जाण्याचा पर्याय आहे. त्यामध्ये अगोदर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा मधील लोक ओबीसी प्रमाणपत्र घेऊन आरक्षणाचा लाभ घेत आहेत. कोकणामध्ये उलट आहे जातींच्या नोंदीमध्ये मराठा आणि जाती आहेत. कुणबी मध्ये ५५ प्रकार आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मराठा- कुणबी तो वेगळा आहे. इथे मराठा व कुणबी सरळ सरळ वेगळे आहेत. त्यामुळे इथे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही. ही तांत्रिक अडचण आहे. त्यामुळे मराठा म्हणून आरक्षणासाठी स्वतंत्र मराठा आरक्षण ५०% च्या आत मध्ये त्यासाठी कोणाच्यातरी आरक्षण काढावे लागेल आणि मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार आतमध्ये जावे लागेल. तर वाद होऊ नये म्हणून स्वतंत्र आरक्षण ५०% वरचे पूर्वी जे होते ते रिस्टोर करावे लागेल. जे सुप्रीम कोर्टामध्ये आहे ते. आरक्षण ५० टक्के च्या पुढे जात असल्याने सुप्रीम कोर्टात योग्य ती कार्यवाही करावी लागेल. जोपर्यंत मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत इडब्ल्यूएसचा पर्याय उपलब्ध आहे, असे चार पर्याय त्यांनी यावेळी सुचवले. कोकणामध्ये जाती लिहिण्यामध्ये कुणबी ही कम्युनिटी मराठा समाजाशी सामाजिक, शैक्षणिक, रक्तनाते संबंधाशी कुठेही येत नाही, यामुळे इथल्या मराठा समाज बांधवांना स्वतंत्र मराठा आरक्षण मिळणे अभिप्रेत आहे, असे मत देखील मांडले.











