कृषी विभाग, आत्मा देवगड व कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन
शिरगाव (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील तोरसोळे येथील ग्रामपंचायत सभागृहात कृषी विभाग, आत्मा देवगड आणि कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०२५ तसेच विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ अंतर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील शास्त्रज्ञ डॉ. भास्करराव काजरेकर यांनी विकसित कृषी संकल्प अभियानाची भूमिका, उद्दिष्टे व संकल्पना याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध संशोधनात्मक व शेतकरीहिताच्या उपक्रमांबाबतही मार्गदर्शन केले.
मुंबई मत्स्य संवर्धन केंद्र (आय.सी.ए.आर.) येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ब्राह्मणे यांनी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवस्थापन, संवर्धनाचे फायदे आणि केंद्र शासनाच्या मत्स्य संवर्धनाशी संबंधित योजनांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी माहिती पत्रिकांचे वाटप करण्यात आले, तसेच नैसर्गिक शेतीविषयक पुस्तिका ग्रामपंचायतीस भेटस्वरूप प्रदान करण्यात आली.
कृषी विभागाचे श्री बी. एम. लांबाडे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. श्री समाधान सपकाळ व श्री निखिल गोसावी यांनी भात बियाणांची बीजप्रक्रिया व उगम क्षमता चाचणी याचे प्रत्यक्षिकाद्वारे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य श्री देवदत्त कदम, प्रगतशील शेतकरी श्री मंगेश राणे, कृषी विज्ञान केंद्राचे श्री सुयश राणे, आत्मा देवगडचे श्री निकेतन राणे, श्री रणजित दाले तसेच परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य श्री देवदत्त कदम होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री निकेतन राणे यांनी केले.










