वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामुळे कोकणच्या लौकिकात अधिक भर पडली – खा. नारायण राणे

*प्रकल्पाचे केले भरभरून कौतुक; प्रकल्पासाठी सहकार्य राहील, अशी दिली ग्वाही*

चिपळूण (प्रतिनिधी):– माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांनी मंगळवारी चिपळूणच्या दौऱ्या दरम्यान वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट देत वाशिष्ठी दूध डेअरीमुळे कोकणाच्या लौकिकात अधिक भर पडली असून भविष्यात हा प्रकल्प मोठी झेप घेईल असा विश्वास व्यक्त करीत या प्रकल्पाचे भरभरून कौतुक केले आणि प्रकल्पाला लागेल ते सहकार्य आपण करू, अशी ग्वाही यावेळी दिली.

खा. नारायण राणे मंगळवारी चिपळूणदौऱ्यावर आले होते. यावेळी बहादूरशेखनाका येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवन येथील जनता दरबारात चिपळूणवासियांचे विकासात्मक गाऱ्हाणे ऐकून ते प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली.

यानंतर खा. नारायण राणे, सौ. निलम राणे यांनी पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे प्रणेते सुभाषराव चव्हाण, चिपळूण नागरी च्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, कु. स्वामिनी यादव यांनी खा. राणे व सौ. राणे यांचे स्वागत केले.

यानंतर खासदार नारायण राणे यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी वाशिष्ठी प्रकल्पाच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची माहिती घेतली. ही माहिती प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांनी दिली. यावर खा. राणे यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे कौतुक केले. या प्रकल्पासाठी जे सहकार्य लागेल ते आपण करू, अशी ग्वाही यावेळी खा. राणे यांनी दिली.

यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे संचालक प्रशांत वाजे, महेंद्र खेतले, अविनाश गुढेकर, जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात, मॅनेजर प्रदीप मगदूम व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट

*चिपळूण नागरी पतसंस्थेला खा. नारायण राणे यांची सदिच्छा भेट*

चिपळूण दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य प्रदान कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी खा. राणे यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी तर सौ. निलम राणे यांचे संचालिका सौ. स्मिता चव्हाण एडवोकेट सौ. नयना पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी स्वागत केले. यावेळी भाजप नेते तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव, चिपळूण नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालक रवींद्र भोसले, सत्यवान म्हामुनकर, सोमा गुडेकर, वैभव चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी खा. नारायण राणे यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्याकडून घेतली. खा. राणे यांच्या सदिच्छा भेटीबद्दल चिपळूण नागरी परिवाराने समाधान व्यक्त केले असून यामुळे आम्हाला ऊर्जा, प्रेरणा मिळाली असल्याची भावना व्यक्त केली आहे.