कशेडीच्या दोन्ही बोगद्यात वीजपुरवठा कार्यान्वित

खेड(प्रतिनिधी)मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दोन्ही बोगद्यात अखेर कायमस्वरूपी वीजपुरवठा कार्यान्वित झाला आहे. यामुळे वाहतुकीतील अडसर दूर झाला आहे. पूर्ण क्षमतेच्या वाहतुकीने प्रवासही वेगवान झाला आहे. दरम्यान, पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे अडथळे उद्भवल्यास तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक साधन सामुग्रीसह सुसज्ज ठेवण्यात आली आहे.

 

राष्ट्रीय महामार्ग विभागाने ११ के.व्ही. क्षमतेच्या विजेची मागणी महावितरणकडे केल्यानंतर अनामत रकमेपोटी ८० लाख रुपये भरणा करण्यासंदर्भात सूचित केले होते. ही प्रक्रिया बारगळल्याने कायमस्वरुपी वीजपुरवठ्याचा प्रश्न रखडला होता. यामुळे बोगद्यात जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र आता राष्ट्रीय महामार्गने सातत्याने पाठपुरावा करत महावितरणकडून ११ मेगावॅट वीजपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा सुरू झाला असून प्रत्येकी १० पंखेही बसवण्यात आले आहेत. यामुळे बोगद्यातून प्रवास करताना वायूविजनाचा सतावणारा प्रश्नही निकाली निघाला आहे

 

 

. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक खुली झाली आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टीत बोगद्यात आपत्ती निर्माण होवू नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून दिवस-रात्र देखरेखीसाठी कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. कशेडी येथील वाहतूक पोलीस मदत केंद्रासही गस्त घालण्याबाबत पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. यामुळे करोडीतील दोन्ही बोगदे वाहतुकीच्या दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना

 

कशेडीच्या दोन्ही बोगद्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. यामुळे वीजपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. दोन्ही बोगद्यातील प्रवास आता सुरळीत झाला आपत्तीवर मात करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजनाही करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचनाही करण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.