उत्तम आरोग्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक; डॉ. विकास कुमरे

वार्ताहर l पाली :नियमित व्यायाम हा केला पाहिजे तसेच संतुलित

आहारात आवश्यक पोषक घटक असावेत तसेच पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे, जेणेकरून शरीर आणि मन आराम करू शकतील. याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची माहिती अद्यावतठेवणे आवश्यक असते असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक स्त्री रुग्णालय डॉ.विकास कुमरे यांनी केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे अंतर्गत नाटे उपकेंद्र येथे स्त्री रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय पाली यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांचे महत्वाचे योगदान लाभले. शिबिरासाठी प्रमुख तज्ञ अधिकारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकिय अधिक्षक स्त्री रुग्णालय डॉ. विकास कुमरे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सचिन साळुंखे,डॉ.तुषार कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविण माने,सीएचओ दिलीप वानखेडे, आरोग्य सहाय्यक बाळकृष्ण कुंभार,झाकीया मुल्लानी त्यासोबत ग्रामीण रुग्णालय पालीचे अधिकारी,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कुमरे यांनी सांगितले की, आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी धूम्रपान, मद्यपान आणि इतर हानिकारक पदार्थांपासून दूर राहा. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि गरज भासल्यास मानसिक आरोग्याच्या मदतीसाठी मानसोपचार तज्ञांची मदत घ्या.स्वच्छ वातावरणात राहा. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि आवश्यक जीवनसत्वे घ्या.

आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी या सर्व बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

मोठ्या प्रमाणात नाटे उपकेंद्र व पंचक्रोशीतील अनेक रुग्णांनी आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहून लाभ घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे व नाटे उपकेंद्र यांच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.