लांजा बस स्थानक प्रवेशद्वार येथे घडली होती घटना
लांजा (प्रतिनिधी) पादचारी वृद्धाला ठोकर देऊन त्याच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी रत्नागिरी- कणकवली एसटी बस चालक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दिनांक ३१ मे रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने लांजा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात घडली होती.
लांजा तालुक्यातील शिरवली पलीकडचीवाडी येथील रहिवासी असलेले महादेव गुणाजी कुळ्ये (वय ६८वर्षे) हे लांजा बसस्थानक या ठिकाणी रस्ता ओलांडत असताना रत्नागिरी कणकवली या एसटी बसने त्यांना धडक दिली होती. या धडकेत त्यांच्या पायाला तसेच कमरेला गंभीर दुखापत झाली होती .त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी रत्नागिरी आणि त्यानंतर मुंबई येथे हलविण्यात आलेले आहे .
अशा प्रकारे लांजा एसटी बस स्टॅन्डमध्ये येत असताना रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता बस हयगयीने व अविचाराने, निष्काळजीपणे चालवून पादचारी महादेव कुळ्ये यांच्या अपघातास कारणीभूत होऊन व त्यांना गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पोलिसांनी एसटी बस चालक अविनाश अशोक हारे (वय ३९, एसटी डेपो कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग,मूळ राहणार मिरजोळी बौद्धवाडी तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) यांच्यावर भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) ,१२५ (ब), मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत.












