होडावडे येथे इंडियन बूल फ्रॉगच्या भक्ष्यवर्तनाची थरारक नोंद
सावंतवाडी । सचिन रेडकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात एका रोमांचक घटनेची नोंद झाली आहे. येथे इंडियन बूल फ्रॉग (Indian Bullfrog – Hoplobatrachus tigerinus) या बेडकाने चक्क नानेटी साप (Common Trinket Snake) गिळल्याचे समोर आले आहे. प्राणी व पक्षी मित्र तथा वन्यजीव अभ्यासक मंगेश माणगावकर यांच्या घरी असलेल्या ‘बेडूक उद्याना’त ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे, जी वन्यजीव अभ्यासात एक महत्त्वपूर्ण भर आहे.
इंडियन बूल फ्रॉग: एक आक्रमक भक्षक
इंडियन बूल फ्रॉग हा दक्षिण आणि आग्नेय आशियातील सर्वात मोठ्या बेडकांपैकी एक आहे, ज्याची लांबी १७० मिलिमीटर (६.७ इंच) पर्यंत वाढू शकते. सहसा हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा असणारा हा बेडूक, प्रजननाच्या काळात मात्र नर पिवळ्या रंगाचे होतात. हा बेडूक त्याच्या भक्षक स्वभावासाठी ओळखला जातो. तो केवळ कीटकच नाही, तर इतर बेडूक, सरडे, पाली, लहान साप, लहान पक्षी आणि अगदी लहान सस्तन प्राणी देखील खातो. तो दिसेल ते आणि त्याच्या तोंडात मावेल ते सर्व गिळतो, त्यामुळे त्याला “अतृप्त भक्षक” असेही म्हटले जाते.
नैसर्गिक अधिवास आणि वर्तन
इंडियन बूल फ्रॉग मुख्यत्वे पाणथळ जागांमध्ये, म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलाशयांमध्ये, विशेषतः भातशेतीत आढळतो. तो जंगली किंवा किनारी भागात सहसा दिसत नाही. बहुतेक वेळा तो एकटाच आणि निशाचर असतो. कायमस्वरूपी पाण्याच्या स्रोतांजवळच्या बिळांमध्ये आणि झुडपांमध्ये तो राहतो. पावसाळ्यात, प्रजननासाठी ते तात्पुरत्या पाण्याच्या डबक्यांमध्ये एकत्र येतात.
या घटनेमुळे इंडियन बूल फ्रॉगच्या भक्ष्यवर्तनावर अधिक प्रकाश पडला आहे आणि वन्यजीव अभ्यासकांना या प्रजातीबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली आहे.









