लांजा शहरात वहाळाच्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात

 

पर्यायी मार्ग उखडून टाकण्याची महामार्ग ठेकेदार कंपनीवर नामुष्की

लांजा (प्रतिनिधी) शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने लांजा शहरातील श्रीराम पुलाजवळील वहाळाला आलेल्या पुराचे पाणी नजीकच्या घरांमध्ये शिरल्याची घटना रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनां साठी तयार केलेला पर्यायी मार्ग रातोरात उखडून टाकण्याची नामुष्की महामार्ग ठेकेदार कंपनीवर ओढवली.

शुक्रवार १३ जून रोजी रात्री साडेदहा वाजता लांजात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. साधारणतः दिड तास विजांच्या कडकडाटांसह पडलेल्या मुसळधार पावसाने लांजात दैना उडवली. शहरातील श्रीराम पुलाजवळील वहाळाला आलेल्या पुराचे पाणी तुंबून ते जवळ असलेल्या नागरिकांच्या

घरांमध्ये घुसले. रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली.

यापुर्वी २७ मे रोजी पडलेल्या मुसळधार पावसाने वहाळाच्या पुराचे पाणी तुंबल्याने श्रीराम पुलाच्या जवळील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यावेळी नवीन पुलावरून वाहतूक सुरू करून वाहनांसाठी तयार केलेला पर्यायी मार्ग जेसीबीने फोडून वहाळ मोकळा करण्यात आला होता. त्यामुळे तिथले पाणी ओरसले होते. त्यानंतर पुन्हा त्याठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता बनविण्यात आला होता. तो पर्यायी रस्ता बनवताना गाळ स्वच्छ न करता सिमेंटचे पाईप बसवल्याने पाऊस जोरात पडला तर पाणी तुंबण्याची शक्यता आहे, असा अंदाज त्यावेळी वर्तविण्यात आला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणा केल्याने अखेर १८ दिवसांतच बनविण्यात आलेला पर्यायी रस्ता फोडण्याची नामुष्की शुक्रवारी रात्री ठेकेदार कंपनीवर आली.

शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे वहाळाच्या पुराचे पाणी श्रीराम पुलाजवळील आसपासच्या घरांमध्ये शिरल्याने नागरिकांची धावपळ झाली. घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला असून पाण्याची मोटार, फ्रीज, टिव्ही, वॉशिंग मशीन आदी उपकरणांमध्ये पाणी शिरल्याने उपरकणे बंद पडली आहेत. यावेळी पुलाजवळील घरांमध्ये पाणी शिरल्याने त्या ठिकाणी संबंधित नागरिकांच्या मदतीला महामार्ग ठेकेदार कंपनीचे कर्मचारी होते, घरातील सामान बाहेर काढण्यासाठी त्यांनी सहकार्य केले.

 

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामामुळे ठिकठिकाणी महामार्गावर पडलेले खड्डे, अर्धवट गटार कामे आणि पाणी पाईपलाईनसाठी खणून उघडे ठेवण्यात आलेले खड्डे आणि त्यामुळे झालेले चिखलाचे साम्राज्य यातून पादचाऱ्यांना चालत जाताना कसरत करावी लागते. तसेच चिखल आणि खड्डयांमुळे वाहन चालकांचे देखील मोठे हाल होत आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतर नागरिक आणि वाहनचालकांचे महामार्गाच्या अर्धवट कामामुळे अतिशय बिकट परिस्थिती झालेली असून संपूर्ण लांजा शहर महामार्गाच्या अर्धवट कामाच्या विळख्यात अडकले आहे.