जिल्हापरिषद शाळात सी.बी.एस.ई. धर्तीवर पाहिलीचा अभ्यासक्रम

मालवणात शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे उत्स्फूर्त स्वागत : पहिली वर्गात 495 विध्यार्थी दाखल : गटशिक्षणाधिकारी संजय माने यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील 187 प्राथमिक शाळेत पहिल्या दिवशी पहिली वर्गात 495 विध्यार्थी दाखल झाले. सर्व नवागत विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावर्षी पाहिलीचा अभ्यासक्रम बदलला असून सी.बी.एस.ई. अभ्यासक्रमाच्या धर्तीवर नवा अभ्यासक्रम आहे. त्यानुसार इयत्ता पहिलीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी दिली.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा येथे इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत गट शिक्षणाधिकारी संजय माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश व बूट आणि सॉक्स चे वितरण करण्यात आले. सदर शाळा प्रवेशोत्सवाच्या दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवण तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये 406 विद्यार्थी दाखल झाले. तर खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेत 89 विध्यार्थी दाखल झाले. सर्वच शाळा मध्ये पहिल्या दिवशी नवागत तसेच सर्व विध्यार्थी यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

मालवण तालुक्यातील सर्व शाळा मध्येही पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमची तसेच सर्व पाठयपुस्तके, गणवेश तसेच बूट आणि सॉक्स वितरण मोफत करण्यात आले.