पर्यटन व फळ प्रक्रिया उद्योगाला चालना द्यावी.
मनीष दळवी सहकार क्षेत्रासाठी चांगले लीडर- जिल्हाधिकारी अनिल पाटील.
सिंधुनगरी l प्रतिनिधी :सिंधुदुर्गात तयार होणाऱ्या फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग प्रकल्प व पर्यटन विकासावर आधारित हॉटेल इंडस्ट्री व त्यावर आधारित विकासात्मक प्रकल्प व्हावेत. यातूनच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. व जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविता येईल. यासाठी नागरिकांसाठी ”मध्यवर्ती” ठरणाऱ्या व जिल्ह्याच्या आतापर्यंतच्या आर्थिक विकासात योगदान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने यापुढाकार घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले. जिल्ह्यातील सहकाराला आणि जिल्हा बँकेला मनीष दळवी यांचा सारखा चांगला लीडर आहे याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आजचा वर्धापन दिन, आज होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा व कृषी दिन या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या विकास संस्थांच्या सचिव व अध्यक्षांचा सन्मान, यानिमित्ताने करण्यात आला. जिल्हाधिकारी अनिल पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, नाबार्ड व्यवस्थापक दीपाली माळी, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे विठ्ठल देसाई, आत्माराम ओटवणेकर,प्रकाश मौर्ये, प्र ढवण, गजानन गावडे, व्हिक्टर डॉटस, नीता राणे, रवींद्र मडगावकर, ॲड बोडस, मेघनाथ धुरी. गणपत देसाई आधी संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे विविध क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी, विकास संस्थांचे सचिव चेअरमन व प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी अनिल पाटील, सहकार उपनिबंधक सोपान शिंदे, नाबार्डच्या व्यवस्थापक श्रीमती दिपाली माळी या सर्वच मान्यवरानी जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचा विकास व या विकासामधील जिल्हा बँकेचे योगदान याबद्दल कौतुक केले. सहकार क्षेत्राला मनीष दळवी यांच्यासारखे चांगले लीडर मिळाले आहेत. त्यामुळे काही वर्षांपूर्वीचा काळ व आताचा काळ पाहता या जिल्ह्यात सहकार क्षेत्राला बळकटी मिळाली आहे. याबद्दल सर्वच मान्यवरानी कौतुक केले. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले या जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोको शंभो या हॉटेलचा उल्लेख करत या हॉटेलचे एका दिवसाचे ७० ते ८० हजार भाडे असतानाही ते कायम फुल असते. त्यामुळे या जिल्ह्यातील निसर्ग पर्यटना आकर्षण आहे पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्याची गरज आहे. हॉटेल इंडस्ट्री व त्यांच्या विकासासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घ्यावा असे आव्हान त्यांनी केले. याशिवाय या जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढविण्याबरोबरच प्रत्येक जनतेचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्हा बँकेने फळ प्रक्रिया प्रकल्पांवर विशेष भर द्यावा, त्या अनुषंगित प्रकल्प व त्याची बाजारपेठ शेतकरी नागरिकांना उपलब्ध करून द्यावी व त्यासाठी प्रयत्न करावा असेही जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
नाबार्डच्या दिपाली माळी यांनी सिंधुदुर्ग बँकेचे काम सर्वांना अभिमान वाटावा असे आहे. सहकार क्षेत्राचा विकास हा जिल्हा बँकेच्या पुढाकारातून झाला आहे. या जिल्ह्यातील विविध कार्यकारी संस्थांचा विकास व त्यांचे संगणकीकरण राज्यात आदर्श वाट ठरले आहे वा या जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचा विकास सर्वच घटकांना प्रेरणादायी आहे असे त्या म्हणाल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी मागच्या काळातील सहकार क्षेत्राचा विकास व आता झालेला विकास याची तुलना करता फार मोठा फरक जाणवतो. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी विकास संस्थांचे केलेले सक्षमीकरण कौतुकास्पद आहे. मनीष दळवी यांची लीडरशिप व त्यांनी केलेले काम गौरवशाली आहे असे ते म्हणाले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी बँकेच्या प्रगतीमध्ये बँकेचे सर्व ग्राहक ठेवीदार कर्जदार बँकेचे अधिकारी कर्मचारी हितचिंतक या सर्वांचाच मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा संस्था सक्षम व्हाव्यात म्हणून जिल्हा बँकेने आपल्या नफ्यातून दोन कोटी रुपयांचा खर्च या सहकारी संस्थांसाठी केला आहे. देशाला आणि राज्याला अपेक्षित असलेला सहकार विकास तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्राच्या विकासासाठी स्वीकारलेले धोरण या जिल्ह्यात प्रभागपणे राबविण्याचे काम या जिल्हा बँकेने केले आहे. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे व या बँकेचे तज्ञ संचालक जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची ही बँक व शेतकऱ्यांच्या विकासाचा कणा असलेल्या सहकारी संस्था सक्षम करण्याचे काम सर्व संचालकांच्या मदतीने या बँकेने केले आहे. पुढच्या काळात नव उद्योजक अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवून जनतेच्या उत्पन्नात वाढ होईल असा प्रयत्न जिल्हा बँकेकडून निश्चित होईल असा विश्वास शेवटी मनीष दळवी यांनी व्यक्त केला.












