गुरुकुलची मुलं पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग !

चिपळूण (प्रतिनिधी): परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमधील गुरुकुल विभागातील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी आणि सांघिक सांगीतिक भजन सेवेचा अनुभव आनंद घेतला.

 

आषाढी एकादशी म्हणजे रविवार सहा जुलै रोजी गुरुकुलातील सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत मंगलवेशात साप्ताहिक सुट्टीचा दिवस असूनही शाळेत उपस्थित राहिले यानंतर विद्यार्थी भगवान परशुरामांचे दर्शन घेऊन मार्कंडीकडील प्रवेशद्वाराने चिंचनाका नगरपरिषद अशा मार्गाने पांडुरंगाच्या नामघोषात, टाळांच्या गजरात दिंडीत सहभागी होऊन खेंड विभागातील श्री देव विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचले.

 

विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी मुळे गजबजलेल्या गर्दी असलेल्या विठ्ठल मंदिरात जवळपास तास सव्वा तास सुरेल सांगीतिक भजन सेवा पांडुरंगाचरणी अर्पण केली.

 

गणपती,पांडुरंगाच्या श्लोकांनी आणि हरी जय जय राम कृष्ण हरी मंत्राने सुरू झालेल्या भजन सेवेमध्ये सुरभी चितळे हिने रूप पाहता लोचनी आणि पद्मनाभा नारायणा, प्रांजल सुरवसे हिने सुंदर ते ध्यान आणि घेई घेई माझे वाचे, अवंतिका जाधव हिने खेळ मांडीयेला वाळवंटी काठी, अनुश्री भागवत हिने नैवेद्य आणिला तुजं पांडुरंगा व वृंदावनी वेणू , गंधार नाईक ने विठू माऊली तू तर मेघ देवळेकर ने ज्ञानियांचा राजा अशी अभंग भक्ती गीते सादर केली त्याचबरोबर अबीर गुलाल,कानडा राजा पंढरीचा हे अभंग तर जाऊ चला पांडुरंग भेटीला आणि राधे गोविंद गोपाळ हे गजर मुलांनी सामूहिक सादर केले.

अध्यापिका सौ.दीपा गद्रे यांनीही पारंपरिक गवळण सादर केली. ओजस कुंटे व श्रीश तांबे यांनी अनुक्रमे संवादिनी व तबला साथ दिली.

 

इयत्ता नववी आणि दहावी मधील विद्यार्थ्यांनी भजन सेवा चालू असताना पांडुरंगाची चित्र प्रत्यक्ष मंदिरात बसून रेखाटली आणि भजन सेवेच्या समाप्तीनंतर मंदिर व्यवस्थापनाकडे गुरुकुल ची आठवण म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.वाचासिद्ध सर यांच्या हस्ते सुपूर्त केली.

 

श्लोक,गजर,रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग, सामूहिक अभंग गायन, व्यक्तिगत अभंग गायनाला सहगायनाने साथ, टाळ वाजवणे, अशा गोष्टी मुलानी आषाढी एकादशीनिमित्त या भजन सेवेच्या पूर्वतयारी तयारी वेळी शाळेतील संगीत कक्षात सरावातून समजून घेतल्या.

 

या कार्यक्रमासाठी गुरुकुलातील सर्व अध्यापक, मुख्याध्यापक श्री.वाचासिद्ध सर, तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक सदस्य श्री.अमित जोशी श्री.विजय चक्रदेव विठ्ठल मंदिरात उपस्थित होते.