होमिओपथी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीविरोधात तीव्र संताप; आयएमएचे तहसिलदारांना निवेदन

चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (MMC) होमिओपथी डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या निर्णयामुळे राज्यभरातील आधुनिक वैद्यकीय (MBBS व तत्सम पदवीधारक) डॉक्टरांत तीव्र नाराजी पसरली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र शाखा चिपळूणच्या वतीने शासनाकरिता तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे शाखाध्यक्ष डॉ. अब्बास जबले यांच्यासह चिपळूणमधील डॉक्टरांनी हे निवेदन सादर केले.

 

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम आणि राज्य सचिव डॉ. अनिल आव्हाड यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही फक्त वैध MBBS किंवा तत्सम पदवी प्राप्त डॉक्टरांसाठी आहे. दुसरीकडे, होमिओपथी ही स्वतंत्र वैद्यकीय प्रणाली असून तिचे प्रतिनिधित्व करणारी स्वतंत्र परिषद – महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपथी अस्तित्वात आहे. त्यामुळे होमिओपथी डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी देणे हे अन्यायकारक, अप्रामाणिक आणि सार्वजनिक आरोग्यास धोकादायक ठरेल.

 

IMA च्या म्हणण्यानुसार, CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) हा फक्त सहा महिन्यांचा अल्पकालीन अभ्यासक्रम असून, तो MBBS शिक्षणाच्या तुलनेत अत्यंत तोकडा व अपुरा आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याने कोणतीही वैद्यकीय कार्यक्षमता किंवा आधुनिक वैद्यकशास्त्राची सखोल समज प्राप्त होत नाही. त्यामुळे अशा डॉक्टरांना थेट MMC मध्ये नोंदणी देणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे आहे.

 

IMA ने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर हा निर्णय तात्काळ मागे घेतला गेला नाही, तर हजारो आधुनिक वैद्यकीय डॉक्टर आंदोलन, धरणे, निदर्शने अशा लोकशाही मार्गांचा अवलंब करतील. “होमिओपथी डॉक्टरांनी त्यांचे कार्य त्यांच्या परिषदेच्या परिघात मर्यादित ठेवावे. त्यांच्या नोंदणीसाठी MMC सारख्या परिषदेचा वापर चुकीचा असून, त्यामुळे विश्वासार्हतेला तडे जातील,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

यावेळी डॉ. अरविंद पोतदार, मुश्ताक मुकादम, डॉ. ओंकार शर्मा, डॉ. कांचन मदार, डॉ. रत्नाकर घाणेकर, डॉ. वर्षा रीळकर, डॉ. दीप्ती पाटणकर, डॉ. अश्विनी गणपत्ये, डॉ. सुनील कोतकुंडे, डॉ. श्रुतिका कोतकुंडे, डॉ. असित नरवडे आदी उपस्थित होते.