साळशी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम
शिरगाव (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर, साळशी यांच्या वतीने ‘रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सव’ ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना स्थानिक रानभाज्यांचे पोषणमूल्य, उपयोग व महत्त्व समजावून देणे, आणि त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात वाढ करणे असे होते.
या उपक्रमात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शेवगा, अळू, टाकळा, कुरडू, कुडाच्या शेंगा आदी रानभाज्यांचे आकर्षक सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी स्वतः विक्रीत भाग घेऊन संवादकौशल्य, संयोजन व व्यवहारिकता यांचे प्रत्यक्ष शिक्षण घेतले.
या महोत्सवाला साळशीचे उपसरपंच पांडुरंग मिराशी, पोलीस पाटील कामिनी नाईक, या प्रशालेचे संस्था पदाधिकारी, तसेच साळशीसह पंचक्रोशीतील पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने भेट दिली. व विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत रानभाज्यांची खरेदीही केली.
यावेळी मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींसह सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
या उपक्रमात शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, संवादकौशल्य आणि व्यवहारज्ञान वाढीस लागले.











