दोघांना घेतले ताब्यात, चौकशीसाठी नेले मुंबईत
लांजा( प्रतिनिधी) ठाणे आणि नवी मुंबई येथील एटीएस (दहशतवाद पथक) यांनी तालुक्यातील देवधे येथील कात बॉयलरवर केलेल्या कारवाईमध्ये सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचा अवैधरित्या आणलेले खैराचे लाकूड जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बॉयलर चालकास ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. खैराच्या लाकडातून मिळणारा अवैध पैसा हा अतिरेकी कारवायांसाठी वापरला जातो का? असा संशय असून अटक केलेल्या दोघांना चौकशीसाठी मुंबईत नेण्यात आले आहे.
लांजा तालुक्यातील देवधे या ठिकाणी गुरुवारी २४ जुलै रोजी सकाळपासून रात्रीपर्यंत एटीएस पथकाची कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे .
देवधे येथे बरमारे नामक व्यक्तीचा कात बॉयलर आहे. मात्र हा कात बॉयलर अनेक दिवसांपासून बंद आहे .याच कात बॉयलरवर मुंबई येथून एक जण ट्रक मधून विनापरवाना खैराच्या लाकडाची वाहतूक करून हे खैर देवधेतील बॉयलर वर आणून ठेवले होते .याची माहिती एटीएस पथकाला मिळाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईच्या एटीएस पथकाने या ट्रकचा पाठलाग करत ते देवधे येथे पोहोचेले होते.
बरमारे नामक व्यक्तीचा बॉयलर बंद असताना देखील या ठिकाणी अवैधरित्या कात भट्टी चालवली जात असल्याचे समजते .दरम्यान एटीएस पथकाने केलेल्या या कारवाईत बरमारे यांचे बॉयलरच्या जागेमध्ये सुमारे दहा ते बारा लाख रुपये किमतीचे खैराचे लाकूड आढळून आले. हा सर्व मुद्देमाल एटीएस पथकाने जप्त केला आहे. त्याचप्रमाणे खैराचे वाहतूक करणारा ट्रक देखील ताब्यात घेतला आहे. एटीएस पथकाने बरमारे नामक व्यक्ती तसेच ट्रकमालक या दोघांनाही ताब्यात घेतले असून अधिक चौकशीसाठी त्यांना मुंबई नेण्यात आल्याचे समजते.
खैराच्या लाकडातून मिळणाऱ्या अवैध पैशाचा वापर गैर कामासाठी केला जात असल्याचा संशय एटीएस पथकाला असून त्यादृष्टीने ही एटीएस पथकाने कारवाई केली आहे .याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही .
दरम्यान तालुक्यातील कात बॉयलर बंद असताना अशा प्रकारे झालेल्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.










