दापोली प्रतिनिधी: नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सन असून या दिवशी नागाची व वारुळाची पूजा केली जाते. मात्र काही ठिकाणी नागांचे प्रदर्शन करुन गारुडी लोकांकडून नागांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार केले जातात. त्यामुळे नागरिकांनी गारुडी मुक्त नागपंचमी साजरी करावी, असे आवाहन वाईल्ड ऍनिमल रेस्क्युअर सामाजिक संघटना दापोली यांनी केले आहे.
नागपंचमी सण साजरा करत असताना नाग व वारुळाला जास्त महत्व आहे. नागपंचमीच्या दिवशी महिला वारुळाची पूजा करताना नागाला दूध पाजण्याच्या भावनेने वारूळावर दूध ओततात. मात्र हि बाब अंधश्रद्धा आहे. मुळात नाग हा सरपटणारा प्राणी असल्याने दूध त्याचे खाद्य नाही. सापाच्या शरीरात दूध गेल्यास साप आजारी पडून दगावतो. अशी स्थिती असताना काही गारुडी लोक नागाला पकडून त्याचे दात पाडून, नागांचे तोंड शिवून, त्याला उपाशी ठेवून नागांना दूध पाजून नागरिकांमध्ये अंधश्रद्धा पसरवत नागपंचमीच्या दिवशी काही सोसायटी व मनुष्यवस्ती मध्ये नाग घेऊन फिरत असतात. कित्येकदा वनविभाग व वन्य जीवांचे रक्षण करणाऱ्या संस्थांनी असे नाग जप्त करुन नागांची सुटका देखील केली आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कोठेही नागपंचमीच्या दिवशी गारुडी लोक नागांच्या जीवांशी खेळत असल्यास नागरिकांनी वनविभागाशी १९२६ या क्रमांकावर तसेच कोठेही गारुडी सापांना घेऊन आल्याचे आढळून आल्यास वनविभाग व जवळील सर्पमित्रांना संपर्क साधून नागांसह सापांची सुटका करण्यास मदत करावी, असे वाईल्ड ऍनिमल रेस्क्युअर संघटना यांनी गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.










