शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण व प्रेरणादायी कार्याची दखल
शाल, सन्मानपत्र, गौरवचिन्ह व पदक देऊन गौरव
शिरगाव (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील शिरगाव-शेवरे येथील प्रा. विशाखा जयश्री प्रभाकर साटम यांना ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न आदर्श प्राध्यापिका पुरस्कार २०२५ ‘ नुकताच प्रदान करण्यात आला. हा सोहळा पुण्यातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड येथे पार पडला.
गेल्या नऊ वर्षांपासून शिरगाव येथील स्काय एज्युकेशन कोचिंग क्लासेसद्वारे प्रा.विशाखा साटम या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य दिशा व सातत्याने प्रेरणा देत आहेत. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी शेकडो विद्यार्थी घडवले. त्यांच्या वैयक्तिक लक्ष, शिस्तबद्ध अध्यापनशैली व सातत्यपूर्ण प्रयत्नांतून अनेक विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.
या उल्लेखनीय शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन आजवर त्यांना ३५० हून अधिक प्रशस्तीपत्रे, सन्मानचिन्हे आणि गौरवपत्रे प्राप्त झाली आहेत.
या यशस्वी कार्यासाठी त्यांना शाल, सन्मानपत्र, गौरवचिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल शिरगाव पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या समारंभास तुकाराम बाबा महाराज (मठाधिपती, संत बागडे बाबा आश्रम), वैशाली मार्तंड चव्हाण (सहाय्यक आयुक्त, पुणे महापालिका), श्रीराम मांडरके (अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे), प्राजक्ता मांजुलकर (रील स्टार), कु. श्वेता परदेशी (इंटरनॅशनल मॉडेल), ममता भोई (मिस इंडिया) आणि ए. डी. फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अशोक गोराड उपस्थित होते.












