सावंतवाडी । प्रतिनिधी : जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली-सिंधुदुर्गचा सातवीतील विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून आपल्या शाळेचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय क्रमांक
लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त कला अकादमी, मुंबईने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत नीलने राज्यातून तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या यशासाठी त्याला त्याचे मामा डॉ. उमेश सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेतही यश
सफर सह्याद्री शिवोत्सव, मुंबईने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत नीलने प्रथम क्रमांक आणि कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून आपले बहुआयामी कौशल्य सिद्ध केले.
‘सह्याद्री गुणगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित
काही महिन्यांपूर्वीच नीलला त्याच्या या सर्व यशाची दखल घेऊन सिंधुदुर्गमधील प्रतिष्ठित अशा सह्याद्री प्रतिष्ठानने ‘सह्याद्री गुणगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले होते. नीलने आतापर्यंत चित्रकला, हस्ताक्षर, वेशभूषा, गीत गायन, कथाकथन, अभिनय, वक्तृत्व, निबंध आणि मॉडलिंग अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पाचशेहून अधिक बक्षिसे जिंकली आहेत. या सर्व स्पर्धांसाठी त्याला त्याचे आई-वडील, गौरी आणि नितीन बांदेकर यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.
नीलच्या या दैदीप्यमान यशाबद्दल विविध स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. त्याच्या या यशामुळे त्याच्या शाळेची आणि जिल्ह्याची मान उंचावली आहे.












