विठु नामाच्या गजराने राजापूर शहर बाजारपेठ गजबजली

श्रावणी एकादशीचे औचित्य साधून राजापूरात वारकरी दिंडी

राजापूर (वार्ताहर): श्रावणातील पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून मंगळवारी राजापूर तालुक्यातील वारकरी मंडळीनी श्री भक्त पुंडलिक मंदिर ते विठ्ठल मंदिर बाजारपेठ अशी वारकरी दिंडी काढली. पारंपारिक वेषातील या दिंडीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले तर विठु नामाच्या गजराने शहर बाजारपेठ गजबजून गेली.
गेल्या काही वर्षात कोकणातून पंढरपूर वारीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. कोकणातील ही वारकरी मंडळी विशेषत: कार्तिकी एकादशीला पंढरीची वारी करतात. राजापूर तालुका व शहर परिसरातील अनेक वारकरी मंडळी पंढरपूर वारीला जातात त्या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावरील पुंडलिक मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत पंढरपूर येथे वारी काढली जाते. पण आषाढी एकादशीला शेतीच्या कामामुळे या सर्व मंडळींना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही.
म्हणून कोकणातील राजापूर बाजारपेठे मधील प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये दरवर्षी श्रावणातील एकादशीला वारी काढण्याचा संकल्प या वारकरी मंडळींनी केला आहे. यावर्षी सलग दुसऱ्या वर्षी मंगळवारी पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून ही वारकरी दिंडी काढण्यात आली.
सकाळी सर्व मंडळी पुंडलिक मंदिर येथे एकत्र जमली. त्या ठिकाणी अर्जुना नदीमध्ये स्नान करून व श्री भक्त पुंडलिकाची पूजा करून टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल मंदिरापासून बंदरधक्का, छत्रपती शिवजी महाराज मार्ग जवाहरचौक बाजारपेठ अशी ही दिंडी काढण्यात आली. जवाहरचौक येथे आल्यावर भाविकांनी रिंगण धरत भाव भक्तीचा वेगळा अविष्कार घडविला. बाजारपेठेतील इतिहासकालिन श्री विठ्ठल पंचायतन मंदिरात दिंडीची सांगता झाली. त्या ठिकाणी भजन व हरिनामाचा पाठ होऊन दिंडीची सांगता झाली. वारकरी संप्रदायाचे प्रमुख ह. भ. प. श्री. दादा राजापकर, श्री. विठ्ठल चोरगे, अंकुश पावसकर, राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष रविंद्र नागरेकर, राजेश सोडये, धनाजी तांबे, यांसह भक्त वत्सल भक्ती भाव मंडळाचे संदीप मालपेकर, राजन नवाळे, अनंत रानडे, विवेक गादीकर व अन्य सदस्य तसेच तालुक्यातील महिला पुरूष वारकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
फोटो 5 आरजेपी 1।2।3
श्रावणी एकादशीनिमित्त शुक्रवारी राजापूरात भक्त पुंडलिक मंदिर ते विठ्ठल मंदिर अशी वारकरी दिंडी काढण्यात आली.