‘ती’ दोन माणसे कोण? राहुल गांधींनी नावे जाहीर करावी: प्रकाश आंबेडकर

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे, ‘निवडणुका जिंकून देण्याचा दावा करणारी शरद पवारांसोबतची ती दोन माणसे कोण?’ असा प्रश्न विचारत त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका दाव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी हा हल्लाबोल केला आहे.
शरद पवार यांनी शनिवारी नागपूर येथे बोलताना सांगितले होते की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणुका जिंकून देण्याचा दावा करणारी दोन मंडळी त्यांना भेटली होती. त्यांना आपण राहुल गांधी यांच्यासमोरही नेले, परंतु राहुल गांधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, “किती खोटं बोलावं याला मर्यादा असते.” राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते असल्याने त्यांच्याकडे कोण येतात आणि कोण जातात याची नोंद असायलाच हवी. त्यामुळे शरद पवारांनी ज्या दोन लोकांना सोबत आणले, त्यांची नावे राहुल गांधींनी जाहीर करावीत, अशी मागणी त्यांनी केली.
शरद पवारांच्या ‘मंडल यात्रे’वरही टीकायावेळी प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांनी सुरू केलेल्या ‘मंडल यात्रे’वरही जोरदार टीका केली. या यात्रेचा उद्देश ओबीसींचे कल्याण नसून, त्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसने विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या शिष्यवृत्तीला विरोध केला होता, असेही ते म्हणाले. “ओबीसी हा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जातोय आणि श्रीमंत मराठा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार आहे,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.