माजी आमदार शिवराम दळवी यांनी साधला आध्यात्मिक संवाद

सावंतवाडी । प्रतिनिधी : श्रावण मासाच्या शेवटच्या सोमवारी आज सावंतवाडी संस्थानाच्या ऐतिहासिक श्री देव पाटेकर मंदिराचे वातावरण मंगलमय झाले होते. या सोहळ्याच्या आध्यात्मिक आणि पारंपारिक स्पंदनांचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.
गेली अनेक वर्षे चालत आलेल्या या परंपरेचा मान राखत, माजी आमदार श्री. शिवराम दळवी यांच्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन केले होते.
श्रावण मासाच्या प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रम पार पडतात. आज श्री देव पाटेकर मंदिरात पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन श्री. दळवी यांच्यामार्फत करण्यात आले. यावेळी भक्तांनी देवघरात जाऊन श्री देव पाटेकराचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला.
या वेळी बोलताना श्री. दळवी यांनी या सोहळ्याची परंपरा राजमाता कै. श्रीमंत सत्यशिलादेवी भोसले यांच्या आशीर्वादाने सुरू झाल्याचे सांगितले. “राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी खेम सावंत भोसले, युवराज लखमसावंत भोसले आणि युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या सहकार्याने आम्ही या देव पाटेकराची सेवा करत आहोत,” असेही त्यांनी नम्रपणे सांगितले.
या प्रसंगी श्री. दळवी यांनी देवाकडे प्रार्थना केली की “येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि जिल्ह्यातील जनतेला सुखी व समाधानी जीवन लाभो.”
या पवित्र सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या सोहळ्याने केवळ धार्मिक वातावरणाला उजाळा दिला नाही, तर सावंतवाडीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसाही जपला.













