रुग्ण कल्याण समिती सदस्य देव्या सूर्याजी व रवी जाधव यांनी घेतली भेट
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णांना अत्यंत प्रामाणिक आणि चांगली सेवा दिली जात आहे. त्यामुळे या रुग्णालयाची नाहक बदनामी थांबवा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सावंतवाडीकरांना केले आहे. रुग्णालयाबद्दल चुकीच्या बातम्या पसरल्यामुळे नव्या डॉक्टरांना येथे येण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
जुन्या मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या या रुग्णालयात जिल्हा रुग्णालयाच्या तुलनेत अधिक सेवा पुरवली जात आहे. मात्र, सतत होत असलेल्या बदनामीमुळे येथे डॉक्टर येण्यास तयार होत नाहीत, असे डॉ. ऐवळे यांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत ते स्वतः आणि डॉ. पांडुरंग वजराटकर निवृत्त होणार आहेत. त्याचबरोबर सर्जन डॉ. गिरीशकुमार चौगुले आणि अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल अवधूत यांनी कालावधी संपल्याने बदलीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी आणि रवी जाधव यांनी डॉक्टरांची भेट घेऊन निवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना दोन वर्षांसाठी सेवा वाढवण्याची आणि बदलीची मागणी मागे घेण्याची विनंती केली.
यावेळी बोलताना डॉ. ऐवळे म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उत्कृष्ट सेवा दिली जात आहे. येथील डॉक्टर वेळ आणि जीवाची पर्वा न करता २४ तास सेवा देत आहेत. असे असतानाही काही विशिष्ट लोकांकडून रुग्णालयाला नाहक बदनाम केले जात आहे. ‘फिजिशियन नसल्यामुळे रुग्णाचा प्राण गेला’ अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. प्रत्यक्षात अनेक गंभीर रुग्णांना येथील डॉक्टर स्थिर करून पुढील उपचारासाठी पाठवत आहेत.”
रुग्णालयात सिटी स्कॅन, डायलिसिस आणि प्रसूतीसारख्या सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांची संख्या मोठी आहे. असे असतानाही चुकीच्या बातम्यांमुळे नवीन डॉक्टरांना येथे येण्यापासून परावृत्त केले जात आहे. यामुळे सध्या कार्यरत असलेले डॉक्टर निवृत्त झाल्यावर किंवा त्यांची बदली झाल्यावर त्याचा फटका रुग्णांनाच बसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता तरी विरोधासाठी विरोध करणाऱ्यांनी रुग्णालयाची बदनामी थांबवावी, असे आवाहन डॉ. ऐवळे यांनी केले.
यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री. जाधव आणि श्री. सूर्याजी यांनी रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्याचे तसेच कालावधी संपलेल्या डॉक्टरांची सेवा दोन वर्षांसाठी वाढवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.











