भाजप माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा आरोप; चौकशी व कारवाईची मागणी
मंडणगड | प्रतिनिधी : तालुक्यातील भिंगळोली येथील हॉटेल व्यावसायिक आकाश चव्हाण (२५) यांना मंडणगडचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी मारहाण केली व अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप करत संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी भिंगळोली येथील भाजप कार्यालयात आयोजित (12 सप्टेंबर रोजी ) पत्रकार परिषदेत केली.
यावेळी केदार साठे पुढे म्हणाले की, आकाश चव्हाण याला पोलिस ठाण्यामध्ये बोलावून अपमानास्पद वागणूक देण्याबरोबरच चार दिवसांपासून आकाश यांच्या हॉटेलच्या कागदपत्रांपासून विविध तपासण्या केल्या जात आहेत. या संदर्भात आकाशच्या विरोधात कोणतीही अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही. हॉटेल व्यवसायिक चव्हाण कुटुंबीय त्यांच्याविरोधात यापूर्वीही पोलिस ठाण्यामध्ये कोणतीही तक्रार दाखल नाही. असे असताना वारंवार चौकशी करण्यासाठी आकाशला पोलीस ठाण्यात बोलावले जात आहे. कोणत्या कारणाने चौकशीसाठी बोलावले व मारहाण केली, याची समर्पक माहिती न मिळाल्याने पूर्ण चव्हाण कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक गवारे यांच्याशी एक तास केलेल्या चर्चेत कोणेतही उत्तर न दिल्याने आपण वरिष्ठांकडून या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची अशी मागणी केल्याचे साठे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रवीण कदम, श्रीराम इदाते, माजी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब मोरे, सरचिटणीस गिरीश जोशी आदी उपस्थित होते.
या विषयासंदर्भात पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्याशी संपर्क साधला असता, आकाश चव्हाणला कोणत्याही प्रकारची मारहाण पोलिस ठाण्यामध्ये झाली नसल्याचे श्री. गवारे यांनी सांगितले. एका महिलेच्या विषयासंदर्भात केवळ चौकशीचा भाग म्हणून चौकशी करण्यासाठी आकाश चव्हाण यांना मंडणगड पोलीस ठाण्यात बोलवले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यास कोणत्याही प्रकारची चुकीच्या पद्धतीने मारहाण झालेली नसल्याचे स्पष्ट केले.










