सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे साहित्य संमेलन यंदा सावंतवाडी शहरात होणार आहे. श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा विभाग, सावंतवाडी या संस्थेच्या प्रस्तावाला यासाठी मान्यता मिळाली आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संमेलनाचा मुख्य उद्देश ‘जिल्ह्यातील अलक्षीत साहित्य’ लोकांसमोर आणणे हा आहे.
डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या संमेलनासाठी शासनाकडून ५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
जिल्ह्यातून आलेल्या ९ प्रस्तावांमधून श्रीराम वाचन मंदिराच्या प्रस्तावाची निवड करण्यात आली. २० डिसेंबर रोजी हे संमेलन आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रा. बांदेकर यांनी सांगितले.
या संमेलनात दिवसभर विविध साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात उद्घाटन, परिसंवाद, मुलाखत आणि कवी संमेलनाचा समावेश आहे. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांची भूमी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्लक्षित राहिलेल्या साहित्यिकांना व्यासपीठ देणे हे संमेलनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे, ‘जिल्ह्यातील अलक्षीत साहित्य’ या विषयावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.
संमेलनाचे अध्यक्षपद एखाद्या ज्येष्ठ साहित्यिकाकडे सोपवण्यात येणार असून, उद्घाटक म्हणून जिल्ह्यातीलच व्यक्तीला निमंत्रित केले जाईल. या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक साहित्यिक उपस्थित राहतील. बऱ्याच वर्षांनंतर जिल्ह्यात असे साहित्य संमेलन होत असल्यामुळे जुन्या साहित्यिक, ज्येष्ठ कलावंत आणि साहित्य निर्मितीत योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्याची संधीही या निमित्ताने मिळणार आहे.
या पत्रकार परिषदेला श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भवन संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर आणि कार्यवाह रमेश बोंद्रे उपस्थित होते.











