चिपळूण नगर पालिका देणार नोटिसीव्दारे व्यावसायिकांना सक्त ताकीद
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत, रस्त्यांवर टाकण्यात येणारे चिकन, मटण, मच्छीसह चायनीज व टाकाऊ पदार्थांचा विषय नागरिकांनी उजेडात आणत कारवाईची जोरदार मागणी केली होती. त्याची नगर पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. टाकाऊ अवशेष, उरलेले जेवण उघड्यावर टाकू नये, अशी सक्त ताकीद शहरातील चिकन, मटण, मासळी विक्रेते, चायनीज सेंटर्स तसेच हॉटेल व्यावसायिकांना नोटिसीव्दारे देण्यात येणार आहे. नियम मोडल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात येणार आहे.
शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या भटक्या श्वानांची संख्या, त्यांच्याकडून बालके, वयोवृध्दांसह नागरिकांवर होणारे हल्ले यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सध्या या प्रश्नावरून नागरिक आणि प्राणीप्रेमी यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीत प्राणीमित्र कार्यकर्त्यांनी भटक्या कुत्र्यांवर अन्याय होऊ नये, त्यांचे संरक्षण व्हावे अशी ठाम भूमिका मांडली. तर दुसरीकडे अनेक नागरिकांनी कुत्र्यांमुळे जीव धोक्यात येत असल्याचे सांगून त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय पर्याय नाही, असा पवित्रा घेतला. या विरोधाभासी भूमिकेमुळे वातावरण तापले आहे. या बैठकीत रस्त्यावर तसेच विविध भागात उघड्यावर फेकण्यात येणारे टाकाऊ पदार्थ, मांस, मच्छीचे अवशेष या विषयावरूनहीं अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. यामुळे या प्रकारांना आळा बसविण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.
मुख्याधिकारी विशाल भोसले मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधिक्षक रोहित खाडे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजीत जाधव यांनी संबंधित व्यावसायिकांना सूचना देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून या नोटीस त्यांना बजावण्यात येणार आहेत.










