भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट तनुष्का सिंह यांचा सावंतवाडीत सत्कार 

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय हवाई दलाच्या इतिहासात जग्वार फायटर जेट स्क्वाड्रनमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती मिळवणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरलेल्या फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह यांचा सावंतवाडी येथे दीपकभाई केसरकर मित्रमंडळाकडून नुकताच सत्कार करण्यात आला. आपल्या बालपणीच्या आठवणींनी जोडलेल्या या भूमीबद्दल बोलताना फ्लाईंग ऑफिसर सिंह यांनी सावंतवाडीकरांनी आपल्याला मुलीसारखं प्रेम दिल्याची कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त केली.

‘देशसेवेचा आदर्श कुटुंबातूनच’

सन्मान स्वीकारल्यानंतर बोलताना फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह म्हणाल्या, “सावंतवाडीत माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी आहेत. इथले लोक माझा परिवार असून त्यांनी मला नेहमीच आपल्या मुलीसारखंच मानलं आहे.”

देशसेवेत दाखल होण्यामागील प्रेरणा स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, त्यांचे आजोबा निवृत्तीनंतर सावंतवाडीत आले होते आणि ते देखील भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून निवृत्त झाले होते. तसेच, त्यांचे वडील देखील लेफ्टनंट कर्नल म्हणून सैन्यदलातून निवृत्त झाले. या दोघांचा आदर्श घेऊनच आपण सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. इतक्या वर्षांनी सावंतवाडीत आल्यावरही मिळालेला सन्मान आणि लोकांचे प्रेम पाहून त्यांना खूप आनंद झाला, असेही त्यांनी नमूद केले.

गौरवास्पद कामगिरी

फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह यांनी जग्वार फायटर जेट स्क्वाड्रनमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती मिळवणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरून नवा इतिहास रचला आहे. त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दलच सावंतवाडीत त्यांचा हा विशेष सन्मान करण्यात आला.

माजी नगरसेविका अनारोजिन लोबो यांनी तनुष्का सिंह यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “देशासाठी कार्यरत असलेल्या या लेकीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

शिक्षण आणि पार्श्वभूमी

मूळच्या उत्तर प्रदेशातील असलेल्या तनुष्का सिंह २००७ पासून मंगळुरू येथे स्थायिक झाल्या. त्यांनी सुरतकल येथील डीपीएस एमआरपीएल स्कूलमधून शालेय शिक्षण आणि मंगळुरू येथील शारदा पीयू कॉलेजमधून पुढील शिक्षण पूर्ण केले. २०२२ मध्ये त्यांनी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. वडिलांनी आणि आजोबांनी भारतीय सैन्यात सेवा केल्यामुळे देशसेवेचा वारसा त्यांना लाभला आहे आणि सावंतवाडीशी त्यांचे भावनिक नाते कायम आहे.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, महिला शहरप्रमुख भारती मोरे, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, शर्वरी धारगळकर, राजन रेडकर, गजानन नाटेकर, संजय गावडे, विश्वास घाग आदींसह दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.