रत्नागिरी : वाणिज्य शाखेतील मुलांना व्यवसाय करताना साहित्य हे आपल्या मानसिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. वाचल्यामुळे जग कळतं आणि त्या जगामध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक ताकद साहित्यातून मिळते, असे प्रतिपादन सांगलीतील साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले.
अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी श्री. शंकर ढोले स्टुडंट्स एनरिचमेंट सेल उपक्रमाअंतर्गत प्रा. महाजन यांच्याशी साहित्यिक गप्पा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रा. महाजन यांनी साहित्यिक पु. ल. देशपांडे, बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज इत्यादी साहित्यिकांच्या अनेकविध आठवणी सांगितल्या व विद्यार्थ्यांना अंतर्मुख होण्यास प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाला अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी उपस्थित होते. त्यांनी व्यक्तीचा भावनिक विकास, व्यवसाय करताना अत्यंत महत्त्वाचा असतो, असे सांगितले. देणगीदार तथा माजी प्राध्यापक श्री. शंकर ढोले यांनी आपल्या मनोगतमध्ये एका शिक्षकांमुळे आपले आयुष्य कसे बदलते आणि योग्य मार्ग सापडतो, याबाबत आठवणी सांगितल्या. याप्रसंगी प्रा. महाजन यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सहकार अंक आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. पर्यवेक्षक विद्याधर केळकर, प्रा. तनुजा शिंदे, वाणिज्य शाखाप्रमुख सौ. शिल्पा तारगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शंकर ढोले स्टुडंट्स एनरीचमेंट सेलची स्थापना वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये व्यवहारचातुर्य, निर्माण करणे तसेच व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि वृद्धिंगत करणे या हेतूने ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला वाणिज्य शाखेतील 142 विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वागत आणि प्रस्तावना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. शिल्पा तारगावकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रभात कोकजे यांनी केले.









